राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता शाहरुख खान शनिवारी मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी शाहरुखने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. तुमच्यामध्ये मुंबईत बदल घडवण्याची एक तीव्र इच्छा दिसते. तुम्हाला मुंबईत बदल घडवावा असे का वाटते ? मुंबईत कसा बदल घडून येणार ? असे प्रश्न शाहरुखने मुख्यमंत्र्यांना विचारले.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भरपूर क्षमता आहे. पण त्या क्षमतेचा उपयोग होत नाही. मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करायचो. पण संधी मिळत नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यावर एमएमआरडी, सिडकोची तिजोरी रिकामी करण्यास सुरुवात केली. एमएमआरडीए ही बँक नाही. तुम्ही पैसा गोळा करुन डिपॉझिट करुन ठेवता. शहराच्या विकासासाठी तुम्ही तो पैसा वापरला पाहिजे. गुंतवला पाहिजे असे फडणवीस म्हणाले.

जगातील अन्य शहरांचा विकास पाहून मुंबईत बदल घडवण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. मुंबईकडे सर्वकाही आहे. मुंबई उत्तम जागतिक शहर बनू शकते. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम झाले नव्हते. मुख्यमंत्री झाल्यावर मी त्याकडे लक्ष दिले असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत मोठी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत.

एसआरए स्कीमध्ये वर्टीकल झोपडया उभ्या राहिल्या. त्यामुळे रोगराई वाढली. नव्या डीसीआरमध्ये आम्ही नियम बदलले. नफा कमी मिळाला तरी चालेल पण लोकांना राहण्यासाठी चांगले घर मिळाले पाहिजे. त्यासाठी मोकळया जागा वाढवल्या. आजही मुंबईतील ४५ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. त्यांना चांगले घर मिळाले पाहिजे तेच मुख्य आव्हान आहे. हे शक्य आहे. पुढच्या सहा ते दहा वर्षात हे घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.