मुंबई : आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे, तुमच्या सर्वांच्या समवेत आम्ही स्वप्न पाहिले होते, ते म्हणजे सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर द्यायचे आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेला आज सुरुवात झाली. १९२०-२२पासूनच्या बीडीडी चाळी स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढा, सामाजिक आंदोलनाच्या साक्षीदार आहेत. अनेक महान व्यक्तीचे वास्तव्य या ठिकाणी होते. त्यामुळे या केवळ चाळी नव्हेत, तर मुंबईच्या आर्थिक-सामाजिक परिवर्तनाचा इतिहास म्हणून बीडीडीकडे पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ घरांच्या चावी वाटपाच्या सोहळ्यात ते बोलत होते. बीडीडी पुनर्विकास होणार नाही असे अनेकजण म्हणायचे, पण हा पुनर्विकास आम्ही करून दाखवला. बीडीडी मार्गी लागले, आता धारावीचा कायापालट करून दाखवणार. धारावी पुनर्विकासाअंतर्गत एक नवीन शहर वसवणार, औद्योगिक वसाहत म्हणून धारावीचा कायापालट करणार, असा निर्धार मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींची कामे पूर्ण करून त्यांना निवासी दाखला घेण्यात आला. या इमारतींतील ५५६ घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी मुंबई मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वप्रथम वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींना भेट दिली. लाल फित कापून इमारतीतील ४० व्या मजल्यावरील घरांची पाहणी केली. इमारतींचे, घरांचे काम पाहून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई मंडळाच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात १६ रहिवाशांना चावी वाटप करण्यात आले. एका सभेनंतर काही रहिवाशांच्या घरी जाण्याची संधी मिळाली, त्यावेळी मी पाहिले , ३०, ४०, ५० वर्षांपासून रहिवासी अतिशय वाईट परिस्थितीत राहत होते. म्हणायला ती चाळ होती, पण झोपडपट्टीपेक्षाही वाईट परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणूनच महायुतीचे सरकार आले तेव्हा बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची मागणी पूर्ण करण्याची वेळ आली आहे असे म्हणत पुनर्विकासाचा निर्णय घेतला. मात्र हा पुनर्विकास का रखडला याचे एक कारण समोर आले ते म्हणजे हा पुनर्विकास कोणता तरी विकासक करेल असे वाटत होते, पण विकासक आराखडे तयार करून रहिवाशांना केवळ स्वप्न दाखवत होते. पुनर्विकास मार्गी लागत नव्हता. विकासकाचे लक्ष्य केवळ विक्री घटकाकडे होते. त्यामुळे विकासकाची काय गरज असे म्हणत आम्ही म्हाडानेच पुनर्विकास करावा असा निर्णय घेतला आणि रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर देण्याचे निश्चित करून पुनर्विकास मार्गी लावल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

पुनर्विकासाचे काम चांगले व्हावे यासाठी या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर निविदा काढली. त्यानुसार आघाडीचे कंत्राटदार नियुक्त करून पुनर्विकास मार्गी लावला. आम्ही ठरवल्याप्रमाणे पुनर्वसित इमारतींचे काम अत्यंत दर्जेदार झाले आहे, असे म्हणत म्हाडाच्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. बीडीडी चाळीमुळे पुनर्विकास हा विकासकांच्या अंगावर टाकूनच होत नाही, तो सरकारी यंत्रणांमधूनही दर्जेदारपणे करता येतो हे स्पष्ट झाले. त्यामुळेच मुंबईतील मुंबईकर मुंबईतच रहावा यासाठी म्हाडाच्या माध्यमातून अभ्युदयनगरसह अनेक वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लावत आहोत. त्याचवेळी धारावी पुनर्विकास होणार हे कित्येक वर्षे ऐकत होतो. पण हा पुनर्विकासही होत नव्हता. पण आज धारावीचा पुनर्विकासही सुरू झाला आहे. धारावीचा पुनर्विकास करणे म्हणजे एक शहर वसविण्यासारखेच आहे. धारावीतून अपात्र रहिवाशांनी इतरत्र जाऊन पुन्हा झोपड्या वसवू नये यासाठी त्यांनाही भाडेतत्वावर घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता धारावीचा आर्थिक विकास केंद्र, औद्योगिक वसाहत म्हणून विकास केला जाणार आहे. हजारो लोकांच्या हाताला काम मिळणार असून हजारो लोकांचे जीवन बदलणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांवर टीका

धारावी पुनर्विकास हाती घेतला तेव्हा अनेकांनी, उपहास केला, शिव्या दिल्या, धारावी विकासकाच्या घशात घालायची आहे असा आरोप केला. पण जगात अशी कोणती निर्मिती आहे जी टीकेशिवाय झाली. लोकांनी कितीही टीका केली, शिव्या दिल्या तरी लोकाच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. तो आम्ही करत आहोत हे दाखविण्याचा आजचा दिवस आहे, असा टोला हाणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

मुंबई झोपडपट्टीमुक्त, खड्डेमुक्त करायची आहे – एकनाथ शिंदे

मुंबईकर आता चाळीतून उत्तुंग इमारतीत जात आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. मुंबईकर मुंबईतच राहिला पाहिजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आला पाहिले हे आमचे ध्येय आहे. त्यानुसार आम्ही पुनर्विकासाची, विकासाची कामे करीत आहोत, करणार आहोत. पुढील दीड-दोन वर्षात तुम्हाला मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही, खड्डेमुक्त मुंबई करून दाखवणार तर दुसरीकडे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्नही प्रत्यक्षात आणणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

घर विकू नका – अजित पवार

म्हाडाने पुनर्वसित इमारतींचे काम अत्यंत दर्जेदार केले आहे. मी इमारतीचा कोपरा ना कोपरा निरखून बघत होतो, कुठे तरी मला काही चूक दिसेल. पण तसे काही झाले नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हाडाचे कामाचे कौतुक केले. तर चाळीतून उत्तुंग इमारतीत राहायला गेला तरी आपली संस्कृती टिकावा असे रहिवाशांना सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत घरे विकू नका असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. १० ते १५ वर्षे घरे विकता येणार नाहीत असे काही करता आले तर पहा अशी सूचनाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरेंची दांडी

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे गुरुवारी वरळीतील ५५६ घरांच्या चावी वाटपाच्या निमित्ताने एका मंचावर येतील अशी चर्चा होती. मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. बीडीडी चाळ पुनर्विकास हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पातील पहिल्या ५५६ घरांचे चावी वाटप होत असतानाही आदित्य ठाकरे उपस्थित न राहिल्याबद्दल रहिवाशांमध्ये चर्चा सुरू होती. स्थानिक आमदार म्हणून त्यांनी उपस्थित राहायला हवे होते, अशीही चर्चा सुरू होती.