मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरील ५.२५ किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्राची अनेक महिन्यांपासून मुंबईकर प्रतीक्षा करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १४ ऑगस्ट रोजी विहार क्षेत्रासह चार पादचारी भुयारी मार्गाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात येणार आहे. हे ठिकाण मुंबईकरांसाठी १५ ऑगस्टपासून खुले होईल.

वांद्रे येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) सध्या सकाळी ७ ते रात्री १२ या वेळेत वाहतुकीसाठी खुला असतो. शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी २४ तास खुला करण्यात येणार आहे. तसेच, लोकार्पण झालेले विहार क्षेत्र आणि पादचारी भुयारी मार्ग १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० पासून खुले करण्यात येणार आहेत.

लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री व मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त यतीन दळवी आदी उपस्थित राहणार आहेत.

विहार क्षेत्रावरील सुविधा कोणत्या?

नागरिकांसाठी विरंगुळा, तसेच शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने महानगरपालिकेने विहार क्षेत्रावर विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विहार क्षेत्रावर सायकल मार्गिका तयार करण्यात आली आहे. निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासोबतच विहार क्षेत्रावर आसन व्यवस्थेचीही सोय करण्यात आली आहे. तसेच, ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली आहे. उपलब्ध जागेनुसार विविध फुलझाडे, शोभेची झाडे, समुद्र किनारी वाढू शकतील अशी झाडे लावण्यात आली आहेत. या विहार क्षेत्राकडे जाण्यासाठी उभारलेल्या भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी स्वतंत्र उतार मार्ग (रॅम्प) तयार करण्यात आला आहे.

भुयारी मार्गावर कसे पोहोचाल ?

१) भुयारी मार्ग क्रमांक ४ येथे येण्यासाठी भुलाभाई देसाई मार्गावरील आकृती पार्किंग इमारत येथून प्रवेश देण्यात आला आहे.

२) भुयारी मार्ग क्रमांक ६ येथे येण्यासाठी वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली जंक्शन) येथून प्रवेश देण्यात आला आहे.

३) भुयारी मार्ग क्रमांक ११ येथे येण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील वरळी दुग्ध शाळेसमोर प्रवेश देण्यात आला आहे.

४) भुयारी मार्ग क्रमांक १४ येथे येण्यासाठी वरळीतील बिंदुमाधव ठाकरे चौक या ठिकाणाहून प्रवेशाची सोय आहे. या सर्व ठिकाणांहून भुयारी मार्गात जाण्यासाठी पायऱ्या तसेच उतार मार्गाची (रॅम्प) व्यवस्था आहे. जेणेकरून सायकलस्वार व दिव्यांग तेथे सहज प्रवेश करू शकतील.