मुंबई : महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करण्यात यावी. तसेच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी सचिवांच्या राज्यस्तरीय केडरच्या निर्मितीसाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करणेबाबत बैठक घेण्यात आली. या वेळी पणन मंत्री जयकुमार रावल हे उपस्थित होते.
महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ निर्मिती करण्यासाठी पणन, महसूल आणि पशूसंवर्धन आणि दुग्धविकास आदी विभागांनी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करावी. राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सक्षमीकरणासाठी सचिवांचे राज्यस्तरीय केडरची निर्मिती करण्यात येईल. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जागा नाही, याकरिता संबंधित जिल्हा सहनिबंधक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावा, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.
या वेळी पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, फ्रान्समधील रुंगीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या धर्तीवर महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी जागा निश्चित करण्याची मागणी सध्या केंद्रस्थानी असून, विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या प्रकल्पात सहभागाची तयारी दर्शवली आहे. यामध्ये रूंगीस मार्केट सारख्या जागतिक ख्यातीच्या बाजारपेठेचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले असून, त्यांनी राज्य शासनाशी चर्चा करत या बाजारपेठेच्या उभारणीत सहकार्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे देश-विदेशात शेतीमालाचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे, असे पणन मंत्री रावल यांनी सांगितले. या वेळी ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथील मल्टी मॉडेल हबसह कृषी पणन विषयक सोयी – सुविधा उपलब्ध करणे. नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथील कृषी पणन विषयक सोयी – सुविधा प्रकल्प उभारणे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बळकटीकरण करणे. एक तालुका एक तालुका कृषी उत्पन्न समिती स्थापन करणे. आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी विषयांबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.