उत्पादन व रोजगार वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. याचाच भाग म्हणून मुकेश अंबानी, बाबा कल्याणी आणि अजय पिरामल या आघाडीच्या उद्योगपतींना निमंत्रित करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करावी, अशी अपेक्षा उद्योगपतींनी करताच ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिले.
‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी, कल्याणी उद्योग समूहाचे बाबा कल्याणी आणि पिरामल उद्योग समूहाचे अजय पिरामल या उद्योगपतींना मुख्यमंत्र्यांनी ‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात भोजनासाठी निमंत्रित केले होते. यावेळी राज्यातील औद्योगिकीकरण आणि गुंतवणूक यावर चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच आमचे प्राधान्य राहिले असून, यापुढेही महाराष्ट्रालाच आमची पसंती असेल, असे उद्योगपतींकडून स्पष्ट करण्यात आले. फक्त परवानग्यांना लागणारा विलंब टाळून ही प्रक्रिया गतिमान करण्यावर उद्योगपतींचा भर होता. तसेच मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हाव्यात तसेच राज्यात गुंतवणुकीकरिता वातावरण पोषक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसमावेत उद्योगमंत्री प्रकाश मेहता, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, प्रवीण परदेशी व मिलिंद म्हैसकर हे मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव यावेळी उपस्थित होते. उद्योगपतींना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याकरिता शासनाच्या वतीने एका समन्वयकाची नियुक्ती केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गुंतवणुकीसाठी वातावरण अधिक पोषक करण्यावरही मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला आहे.
औद्योगिकीकरणाबरोबरच रोजगार निर्मितीला राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. उद्योग उभारणीकरिता राज्यात परवानग्यांना विलंब लागतो ही वस्तुस्थिती आहे. पण ही प्रक्रिया आता सुटसुटीत करण्यात येणार असून, परवानग्या मिळण्याचा कालावधी कमी केला जाईल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री