मुंबई : ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभागास दिले. पुण्यातील ‘जीबीएस’बाधितांची संख्या १११वर पोहोचली असून ८० रुग्ण पाच किलोमीटरच्या परिघातील असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.

‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ आजाराने पुण्यातील एक रुग्ण दगावाल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत त्याचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जीबीएसवर सादरीकरण करण्यात आले. पुण्यात सध्या १११ रुग्ण असून ३५ हजार घरे आणि ९४ हजार नागरिकाच्या चाचण्या घेण्यात आल्या क्त्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ची मदत घेतली जाते आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून तो अद्याप जीबीएसमुळेच झाला असल्याची अद्याप पुष्टी नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या.

रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

विशेष व्यवस्थेच्या सूचना

● रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी

● उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. आणखी काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी

● आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न, मांस खाल्यामुळे होतो; अशा प्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे

● पुण्यात ३१ तारखेला क्रिकेट सामना आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा आजार दुर्मीळ आहे, पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, तो प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होतो. याबाबत पुण्यात आढावा घेतला आहे. उपचार आणि तपासणीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे.- प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री