मुंबई : हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी सतर्क आणि सज्ज रहावे. तसेच ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी मुंबईला झोडपले. पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि महानगर प्रदेशात अतिवृष्टी झाली आहे. त्यातच येत्या २४ तासात मुंबई, ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि राज्य आपत्ती निवारण कक्षाकडून पावसाचा आढावा घेतला. एनडीआरएफ-एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन, तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राजकारण करणाऱ्यांना उत्तरे देणार नाही : शिंदे
आपत्तीमध्ये काम करण्याला आमचे प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरे देत बसणार नाही असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपातील हवा काढली. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यानी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, तसेच मुंबई महापालिका नियंत्रण कक्षास भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडसे यांनी रविवारपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत, तसेच करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पावसाचे, तसेच संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट ९.५ कोटी नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच ठाणे, रायगड, मुंबई, पुण्यातील घाट विभागात लाल इशारा जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ठाण्याच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद दले सर्व महानगरपालिकांमध्ये तत्काळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४ तास सुरू राहतील आणि या कक्षातील अधिकाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.