CM Devendra Fadnavis: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत आज राज्यभरात श्रीगणरायाला यंदाच्या वर्षीचा अखेरचा निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री गिरगाव चौपाटी येथे हजेरी लावून सार्वजनिक मंडळांच्या गणरायावर पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबाबत समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “बाप्पाचे विसर्जन होते, तेव्हा सर्वांच्याच मनात हुरहुर लागते. बाप्पाच्या सानिध्यात दहा दिवस आनंदात जातात. लोकांच्या भेटी होतात. सामाजिक अभिसरण होते. अनेकांना आपल्या गुणांची अभिव्यक्ती करता येते. मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की, हे गणेशपर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडले. विसर्जनाच्या मिरवणुका पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत पार पडल्या, याचाही आनंद वाटतो. पुणे आणि मुंबईत मिरवणुकीचे वेगळेच वातावरण पाहायला मिळाले.”

पोलीस विभाग आणि महानगरपालिकेने विसर्जनाची चांगली व्यवस्था केली. भक्तांनीही या सेवेचा योग्य लाभ घेत विसर्जन पार पाडले. मी गणेशभक्तांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंत्रणा आणि भाविकांचे आभार व्यक्त केले.

बाप्पाकडून मला सुबुद्धी मागितली

बाप्पाकडून काय मागितले, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिली सुबुद्धी तर मिळालीच पाहिजे. माझ्यासह इतरांनाही मिळावी, अशी प्रार्थना करतो. कारण इतरांसाठी सुबुद्धी मागायची आणि स्वतःसाठी मागायची नाही, असा मुर्खपणा मी कधीच करणार नाही. सुबुद्धी आणि सन्मान या दोन गोष्टी आपण श्रीगणेशाकडून मागितल्या पाहिजेत.

बाप्पाकडे काय तेवढेच काम आहे…

यावेळी पत्रकारांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बाप्पाकडे काय प्रार्थना केली, असाही प्रश्न विचारला. त्यावर गमतीने मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बाप्पाकडे काय तेवढेच काम आहे? आपल्या मनात जे काही आहे, ते बाप्पाला माहीत असते. त्यामुळे फार काही मागायचे नसते.