मुंबई : महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी असून देशात सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहेत. त्यात ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत. या स्टार्टअपमधूनच भविष्यात मोठे उद्योजक देशाला मिळतील आणि भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केला.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुहू येथील विद्यापीठ परिसरात झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महिला शिक्षणाचे महत्त्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकाऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्राचा वाटा १८ टक्के आहे.
महाराष्ट्रात असलेल्या स्टार्टअप्सपैकी ४५ टक्के स्टार्टअप महिलांचे आहेत. ही संख्या लवकरच पुरुषांपेक्षा जास्त होईल आणि उद्योग विश्वात महिलांचे वर्चस्व असेल. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांची मोठी भूमिका असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज नवकल्पनेतून केवळ नवे उत्पादन नव्हे, तर जीवन अधिक सुलभ केले जात आहे. एखादी कल्पना जेव्हा बाजारपेठेत रूपांतरित होते, तेव्हा ती अर्थव्यवस्थेला गती देते. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्समुळे आता नव्या कल्पनांना वेग मिळत आहे. स्टार्टअपच्या विकासात अधिक कार्यक्षमता आणि गती आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. सार्वजनिक विद्यापीठांमधील इनक्यूबेशन सेंटरसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सवर विशेष भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्रॉंग पामे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव, ‘नॅक’चे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भविष्यामध्ये भर
शिक्षणातील अवघड संकल्पना सोप्या व्हाव्यात आणि शिक्षण कंटाळवाणे न होता मनोंरजक व्हावे, यासाठी राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंचच्या (एनईटीएफ) माध्यमातून शिक्षक प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.
तसेच शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याची योजना तयार करण्यात येत असल्याचे एनईटीएफचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी सांगितले. शिक्षक प्रशिक्षण आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याची एनईटीएफची योजना असल्याची माहितीही सहस्रबुद्धे यांनी दिली.
