आगामी विधानसभा निवडणुकांची परीक्षा सत्ताधारी आघाडी सरकारला कठीण जाणार, असे दिसत असताना ही परीक्षा सोपी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांचा ‘करून दाखवले’ हा मंत्र अवलंबला. पांजरापोळ-घाटकोपर जोडरस्ता आणि खेरवाडी उड्डाणपूल या प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांत मुंबईत पूर्ण केलेल्या, सध्या सुरू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांची जंत्रीच मांडली. तसेच व्यासपीठावर मुंबईतील महायुतीचे खासदार उपस्थित असल्याचे बघून केंद्र सरकारकडून या प्रकल्पांना वेळेवर योग्य परवानग्या मिळत नसल्याची तक्रारही केली.
मुंबईकरांचा प्रवास सुखाचा करणाऱ्या खेरवाडी जंक्शन उड्डाणपुलाची एक मार्गिका आणि पांजरापोळ-घाटकोपर जोडरस्ता (पीजीएलआर) या दोन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा सोमवारी दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्यादरम्यान महायुतीचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित होते. ‘पीजीएलआर’च्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्दय़ांना हात घातला.
गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकारने मुंबईकरांसाठी पूर्व मुक्तमार्ग, राजीव गांधी सागरी सेतू, लालबाग येथील उड्डाणपूल, मोनोरेल, मेट्रो वन, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, गांधीनगर उड्डाणपूल असे विविध प्रकल्प सुरू करण्यात यश मिळवले आहे. मुंबईसारख्या शहरात असे प्रकल्प राबवताना अनेक मुद्दय़ांचा विचार करावा लागतो. मात्र सर्व मुद्दय़ांचा सामना करत आता आम्ही खेरवाडी उड्डाणपूल आणि ‘पीजीएलआर’ हे दोन प्रकल्पही लोकांसाठी खुले करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच सध्या सुरू असलेल्या १० हजार कोटी रुपयांच्या आणि आगामी ३६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईचे अनेक प्रकल्प मार्गी लावताना केंद्र सरकारकडून परवानग्या मिळायला वेळ लागते. त्यामुळे आता नवनियुक्त खासदारांनी मुंबईच्या प्रश्नांची केंद्रात तड लावावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
अबकी बार..
आपल्या भाषणात ‘करून दाखवले’चा सूर लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पुढे काय काय योजना आहेत, याचीही यादी मांडली. या यादीत इंदू मिल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, मरीन ड्राइव्हपुढे समुद्रात भराव टाकून बांधण्यात येणारा ‘कोस्टल रोड’, मेट्रो-३ अशा अनेक प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे हे प्रचाराचे भाषण असल्याची चर्चा होती.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांचेही ‘करून दाखवले’!
आगामी विधानसभा निवडणुकांची परीक्षा सत्ताधारी आघाडी सरकारला कठीण जाणार, असे दिसत असताना ही परीक्षा सोपी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांचा ‘करून दाखवले’ हा मंत्र अवलंबला.
First published on: 17-06-2014 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm inaugurates eastern freeway kherwadi flyover in mumbai