मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मराठी मतदारांची संख्या जास्त असलेल्या बैतुल जिल्ह्य़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी तीन जाहीर सभांमध्ये भाषणे करून काँग्रेसच्या विजयासाठी आवाहन केले.
खेडीबैतुल, गाडसूद आणि मासूद या तीन मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा झाल्या. हेमंत वागदरे आणि सुखदेव पानसे या दोन मराठी उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या . मध्य प्रदेशातील भाजप सरकारने केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी विलंब लावला किंवा निधीचा विनियोगच केला नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला.
 अन्न सुरक्षा योजनेसह गोरगरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेस सरकारने विविध योजना राबविल्या. तसेच समाजातील सर्व वर्गाच्या कल्याणाकरिता काँग्रेसने प्रयत्न केल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे मध्य प्रदेश विधानसभेच्या २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला प्रचाराला पाठविण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. तेव्हा राज्यातील कोणत्याही नेत्याने मध्य प्रदेशात जाण्याचे टाळले होते. यंदा मात्र मुख्यमंत्री चव्हाण यांनी मध्य प्रदेशात दोन टप्प्यांत दौरा केला आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मराठी मतदारांची संख्या जास्त असलेल्या बैतुल जिल्ह्य़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी तीन जाहीर सभांमध्ये भाषणे करून काँग्रेसच्या विजयासाठी आवाहन केले.