पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे २०० वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या ‘मुंबई समाचार’च्या ‘द्विशताब्दी महोत्सवा’मध्ये सहभागी झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे असे म्हटले आहे.

 “मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे आणि होर्मुसजी कामा साहेब हे आमच्या कुटूंबियांपैकी एक आहेत. पण मी गुजराती समजू शकतो पण बोलू शकत नाही. त्यामुळे उद्यापासून मुंबई समाचार वाचायला सुरु करतो. या कार्यक्रमाबद्दल मला विश्वास बसत नाही. एका वृत्तपत्राला २०० वर्षे होत आहेत. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये २०० वर्षे गुजराती वर्तमान पत्र यशस्वीपणाने वाटचाल करत आहे. गुजराती आणि मराठी महाराष्ट्रामध्ये दुधात साखरेप्रमाणे मिळून विरघळून गेलेलो आहोत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“राज्यपालांना मला खास धन्यवाद द्यायचे आहेत. राजभवनामध्ये ब्रिटिशकालीन बंकर सापडल्यानंतर त्याचे रुपांतर त्यांनी तिथे क्रांती गाथाचे दालन केले आहे. ते आता तिर्थस्थान झाले पाहिजे. वृत्तपत्र चालवणे किती कठिण असते ते मला माहिती आहे. कारण आम्हीसुद्धा वृत्तपत्र चालवत आहोत. मी देखील वृत्तपत्र चालवतो वृत्तपत्र चालवणं कठीण असतं. वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहे याच लोकमान्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला होता,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मी मुंबई समाचारला माझ्या शुभेच्छा देतो. आज त्यांना दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. गुजराती आणि मराठीचे नातं अधिकाधिक दृढ व्हावं हीच माझी यानिमित्ताने सदिच्छा आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.