मुंबई : सागरी किनारा प्रकल्पालगत असलेल्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्याकरीता भारतीय वास्तूरचनाकारांनाही संधी द्यावी, अशी मागणी प्रसिद्ध वास्तूरचनाकारांनी केली आहे. प्रख्यात लॅण्डस्केप वास्तुरचनाकार अरुणकुमार यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे. सागरी किनारा प्रकल्पाच्यालगत हिरवळ तयार करण्यासाठीचे संरेखन केवळ एक रुपयात करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्यात येणार असून ही हिरवळ तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाने नुकतीच रिलायन्स कंपनीची निवड केली आहे. हे हरित क्षेत्र मोठमोठ्या कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करण्यात येणार असून त्याकरीता पालिका प्रशासनाने ४०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार रिलायन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. रिलायन्स कंपनीने हे हरित क्षेत्र तयार करण्यासाठी सहा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निवड केली असून त्यातून छाननी करून एका कंपनीची निवड करण्यात येणार आहे. आंततराष्ट्रीय कंपन्यांना हे काम देण्यास प्रख्यात लॅण्डस्केप वास्तुरचनाकार अरुणकुमार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे. सागरी किनारा मार्गाच्या हिरवळीच्या संरेखनामध्ये भारतीय लॅण्डस्केप वास्तुरचनाकार कंपनीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच हे काम १ रुपयात करण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे.

अरुणकुमार हे ‘अरुणकुमार डिझायनर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये (एडीसीपीएल) प्रधान वास्तुरचनाकार आहेत. त्यांच्या कंपनीने आतापर्यंत भारतातील आणि भारताबाहेरील अक्षरधाम मंदिरे, चंबा कॅम्प, ठीकसे (लडाख), लवासा सिटी आणि सहारा ऍम्बी व्हॅली (पुणे), सायन्स सिटी (अहमदाबाद), सोनबर्डी टेकडी इको पार्क (जामनेर), स्वरवेद महामंदिर (वाराणसी) येथील हरित क्षेत्राचे काम केले आहे.