मुंबई : दुष्काळ आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी खोबरेल तेलाच्या किंमतीत तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. या तेलाचा घाऊक बाजारातील दर प्रति किलो १३० रुपयांवरून ४०० रुपयांवर पोहोचले आहेत.
सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, देशात खोबरेल तेलाच्या किंमतीची स्थिती गंभीर झाली आहे. खोबरेल तेलाच्या किंमतीत तब्बल तिप्पटीने वाढ झाली आहे. गत दोन वर्षांपासून नारळ उत्पादनावर ताण येत आहे. मार्च ते मे २०२४ या काळातील कडक उन्हाळ्यामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
उत्पादनात घट झाल्यामुळे गत वर्षभरात खोबरेल तेलाच्या किंमतीत तीन पटीने वाढल्या आहेत. घाऊक बाजारात खोबरेल तेलाच्या किमती प्रति किलो ४०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. खोबरेल तेलाचा खाद्यतेल म्हणून उपयोग प्रामुख्याने केरळमध्ये केला जातो. मात्र, किंमतीत झालेल्या वाढीमुळे खोबरेल तेलाचा ग्राहक अन्य तेलांकडे वळत आहे.
शिवाय खोबरेल तेलात भेसळही वाढली आहे. त्यामुळे किमान वर्षभर खोबरेल तेल किंवा खोबऱ्याची आयात करावी. आयात शुल्कात सवलत द्यावी. जेणेकरून खोबरेल तेलाचा ग्राहक आणि बाजारपेठ कायम राहील. खोबरेल तेलाचा उद्योगही सुरळीत राहील, अशी मागणी सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाने केंद्र सरकारकडे केली आहे.
उद्योगाचे केंद्राकडे धाव
खोबरेल तेलाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी खोबरेल तेल उद्योग विस्कळीत झाला आहे. केंद्र सरकारने या प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करीत खोबरेल तेल आणि खोबऱ्याच्या आयात सुरू केली पाहिजे. अन्यथा ग्राहक आणि उद्योगाचे हित अडचणीत येईल, अशी माहिती सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष भारत मेहता यांनी दिली आहे.