मुंबई : समलैंगिकांसाठी (गे) असलेल्या ॲपवरून तरुणांना जाळ्यात अडकवून त्यांना लुटणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना रेल्वेच्या विशेष पथकाने (स्पेशल टास्क फोर्स) अटक केली. हे दोन तरूण ॲपवरून समलिंगी तरूणांना कांदिवलीच्या एका निर्जनस्थळी बोलवायचे आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान ऐवज लुटायचे. मागील ३ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
मुंबईत राहणाऱ्या २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने एका समलिंगी ॲपमध्ये आपले नाव नोंदवले होते. तो समलिंगी संबंधासाठी जोडीदाराच्या शोधात होता. अनुभव ओझा (१९) या तरुणाने शुक्रवार १६ मे रोजी त्याच्याशी संपर्क साधला. समलिंगी संबंधासाठी तयार असल्याचे सांगून त्याने भेटण्यासाठी जागा निश्चित केली. बोरिवली आणि कांदिवली रेल्वे स्थानकांदरम्यान भारतीय अन्न महामंडाळाचे (एफसीआय) गोदाम आहे. तेथील जाणाऱ्या महामंडाळाच्या रेल्वे रुळाची जागा निर्जन असते. त्यानुसार शुक्रवारी रात्री त्या ठिकाणी भेटाण्याचे ठरले. तक्रारदार तरूण तिथे रात्री ९ वाजता आला. मात्र त्या ठिकाणी अनुभव ओझा बरोबर आणि रवीशंकर उर्फ रवी झा (१९) हाही होता. दोघांनी तक्रारदार तरुणाला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्याच्याकडील महागडा आयफोन, ३० हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किंमतीची कानातील ४ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, तसेच त्याच्याकडील अडीच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. या तरुणाने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बोरिवली रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन रेल्वेचे विशेष तपास पथक (स्पेशल टास्क फोर्स) या प्रकरणाचा तपास करीत होते. तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन पोलिसांनी कांदिवलीच्या पोईसर येथून रविशंकर ऊर्फ रवी ऊर्फ नंदन लीलाकांत झा, (१९) आणि अनुभव ऊर्फ रितीक नन्हेलाल ओझा (१९) या दोन तरुणांना अटक केली. दोन्ही तरुण नामांकित महाविद्यालयात शिकत आहेत.
याबाबत माहिती देताना रेल्वेच्या विशेष तपास पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांनी सांगितले की, आरोपींना झटपट पैसा कमवायचा होता. त्यासाठी मागील ३ महिन्यांपासून त्यांनी हे प्रकार सुरू केले होते. अनुभव ओझा याला शरीर सौष्ठव स्पर्घेत उतरायचे होते. त्यासाठी बळकट शरीर बनविण्यासाठी प्रोटीन, आहार (डाएट) आणि उत्तेजक द्रव्य (स्टेरॉईंडस) आदींची आवश्यकता होती. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. रवी झा याला स्वत:चा आयात-निर्यात व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्याने एक कंपनी देखील नोंदणीकृत केली होती. दर एक दिवसाआड समलिंगी ॲपवर सावज शोधून ते त्यांना लुबाडत होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर, पोलीस उपनिरीक्षक साबीरखान पठाण, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी गोहिल, तसेच विवेक जळवी, सुदर्शन देशमुख, सोमनाथ गायकवाड शोएब शेख, सचिन खंडागळे, सुनील कुंभार, गणेश महागावकर, वैभव शिंदे, महेश काळे, चंद्रकांत होळकर, सिद्धार्थ कांबळे, कुणाल वालडे, स्नेहल गडगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.