कायद्याचेच राज्य असल्याची आयुक्त मेहतांची भूमिका; शिवसेनेच्या पत्रावर स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेतील माफिया राज वरून भाजप-शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. गेली पंचवीस वर्षे पालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेत भागीदार असतानाही भाजपने माफिया राज संपविण्याची घोषणा केली असताना महापालिकेत कायद्याचे राज्य असून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार आपण खपवून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मांडली आहे.

भाजपच्या माफियाराजच्या आरोपानंतर शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना पत्र पाठवून भाजपच्या आरोपाचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करणारे पत्रच पाठवले. पालिकेत माफिया राज आहे का अशी विचारणा त्यांनी केली असून प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण याबाबत भूमिका स्पष्ट करावी असेही या पत्रात म्हटले आहे. याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता यांना विचारले असता, माफिया राज वगैरे कोणत्याही गोष्टीवर आपल्याला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे त्यांनी सांगितले. पालिकेत कायद्यानुसारच काम केले जात असून आयुक्त म्हणून माझ्यासमोर गैरप्रकारांची जी प्रकरणे आली त्या प्रत्येक प्रकरणावर नियमानुसार कारवाई केली आहे. महापालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार मी खपवून घेणार नाही तसेच यापुढेही भ्रष्टाचाराचे कोणतेही प्रकरण पुढे आल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. करदात्या मुंबईकरांना चांगल्या प्रकारच्या नागरी सेवा मिळाल्या पाहिजेत यावर माझा कटाक्ष आहे. मला कोणत्याही आरोप प्रत्यारोपावर बोलायचे नाही. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यावर मी ठाम असून त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यावर माझा भर आहे. या साऱ्यात जर कोणती चुकीची गोष्ट निदर्शनाला आली तर ती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. करदात्यांना चागल्या सुविधा मिळण्याच्या आड येणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल एवढेच मी ठामपणे सांगतो.

..त्यानंतरच आरोप

अजोय मेहता आयुक्तपदी आल्यानंतरच रस्ते घोटाळ्यापासून अनेक मोठे घोटाळ्यांवर कठोर कारवाई सुरु झाली आहे. ३४ रस्त्यांच्या घोटाळ्यातील अहवालानंतर काही अभियंत्यांना तुरुंगात जावे लागले असून अजून २०० रस्त्यांच्या कामांचा अहवाल यायचा आहे. भ्रष्टाचार खणून काढण्याची ठाम भूमिका आयुक्तांनी घेतल्यानंतरच हे आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

गेली पंचवीस वर्षे भाजप आमच्या बरोबर सत्तेत आहे. आता जर कोणाला माफिया राज दिसत असेल तर त्यांनी त्याची माहिती नावानीशी जाहीर करावी. माफिया लोक हे तलवारी व पिस्तुलाचा धाक दाखवून काम करतात. त्यांची माहिती आरोप करणाऱ्यांना असेल तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी

स्नेहल आंबेकर, महापौर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner ajoy mehta comment on mumbai municipal corporation corruption
First published on: 22-10-2016 at 03:14 IST