मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘ हर घर तिरंगा ‘ अभियाना विषयी मुंबईत ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र लावण्यात आले नसून हा राजशिष्टाचाराचा भंग आहे, असा आरोप लोकसभेतील शिवसेना गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राहुल शेवाळे यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. शेवाळे यांनी आपल्या निवेदनात, शासकीय यंत्रणा, लोकप्रतनिधी आणि शासकीय अधिकारी यांना राजशिष्टाचार पाळणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत राजशिष्टाचाराचा भंग म्हणजे गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून विविध जनजागृती मोहीमा राबविताना जाहिराती, भित्तीपत्रके, फलक अशा निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग केला जातो. पालिकेच्यावतीने लावण्यात येणाऱ्या फलकांवर वर, राज्याचे प्रथम नागरिक म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या, ‘ हर घर तिरंगा ‘ या अभियानाविषयीच्या फलकांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र अथवा त्यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे, असा आरोप शेवाळे यांनी केला आहे. खासदार शेवाळे हे नुकतेच शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आधीच्या सरकारच्या कार्यकाळात पालिकेच्या प्रत्येक फलकावर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असायचे. मात्र, राज्यातील नव्या शिवसेना – भाजपा सरकारच्या आकसापोटी आणि जुन्या सरकराप्रती असलेली आपली निष्ठा अधोरेखित करण्यासाठीच पालिका आयुक्त अशा हीन पातळीचे राजकारण करत आहे. मुंबई आयुक्तांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत त्यांना कठोर शब्दांत समज देण्यात यावी तसेच कायदेशीर सल्ला घेऊन राजशिष्टाचार भंग करणाऱ्या आयुक्तांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.