राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याप्रकरणी तक्रारदार समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

या प्रकरणाची चौकशी प्राथमिक टप्प्यावर असून लवकरच वानखेडे यांचा पुन्हा जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. बोरिवली विभागाच्या एसीपी रेखा भवरे यांच्यामार्फत ही चौकशी सुरू आहे. हे प्रकरण गोरेगाव विभागाच्या हद्दीतील आहे. परंतु, गोरेगाव विभागाच्या कारभाराची अतिरिक्त जबाबदारी बोरिवली विभागाच्या एसीपींकडे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

वानखेडे यांनी केलेल्या तक्रारींबाबत तपास करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास याप्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्याबाबतचा अहवाल आयोगालाही पाठवण्यात येणार आहे. अनुसुचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत तक्रारींची चौकशी ‘एसीपी’ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येते.

मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप करताना वानखेडे कुटुंबियांबद्दल ‘बोगस’ या शब्दाचा वापर केला होता. तसेच वर्षभरात त्यांची नोकरी जाणार, त्यांना तुरुंगात टाकणार अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर वानखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आरोपांबाबत आपण तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. वानखेडे यांनी दिल्लीला जाऊन पहिल्या विवाहासंदर्भातील घटस्फोटाची कागदपत्रे व अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सुपूर्द केले. त्यावेळी आयोगाने याप्रकरणी महाराष्ट्र सरकारला २९ ऑक्टोबरला नोटीस दिली असून, सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले, अशी माहिती सांपला यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

 वानखेडे यांच्या कुटुंबियांनी मंगळवारी राज्यपाल भगर्तंसह कोश्यारी यांची भेट घेतली होती. याशिवाय समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनीही नवाब मलिक यांच्याविरोधात अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत औरंगाबाद येथे तक्रार केली आहे. यापूर्वी वानखेडे कुटुंबियांकडून वाशिम व मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint to national commission for scheduled castes and scheduled tribes wankhede case to mumbai police akp
First published on: 11-11-2021 at 01:49 IST