“मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे”, असं वक्तव्य करून शरद पवारांनी वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख सुनेत्रा पवारांकडे होता असं म्हटलं जातंय. यावरून अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केलाय, असं ते म्हणाले.
शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केल्यासारखं वक्तव्य केलं आहे. लेकीला सुनेसारखं वागवा, असं शरद पवारांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु, सुना बाहेरच्या असतात, असं ते म्हणाले. महिलांना प्राधान्य देणारे पवारांनी हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं, असं अनिल पाटील म्हणाले.
“मुळात या वक्तव्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. सुना या बाहेरून आलेल्या असल्या तरी त्यांना लेकीप्रमाणे वागवलं पाहिजे हे वक्तव्य अपेक्षित आहे. पूत्रप्रेम राहिलं नाही म्हणून सुनेला तिरस्काराची भावना येत असेल तर असं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कोणीच करू शकत नाही”, असंही अनिल पाटील म्हणाले.
हेही वाचा >> Photo : “ते धृतराष्ट्र झाले”, सर्वपक्षीय महिला नेत्या शरद पवारांवर का संतापल्या?
नेमकं प्रकरण काय?
बारामतीतील जनतेशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल.” गेल्या काही वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु, राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे या पक्षात फूट पडली आहे. परिणामी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच घरातील भावजय-नणंदा आमनेसामने आल्या आहेत. परिणामी, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे शरद पवारांनीही त्यांना प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले “मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे.”