मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेसने केली असून, या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दय़ावर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांना लक्ष्य करण्यात आल्यावर काँग्रेसने आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसचे सरकार असताना देशात ७२ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले होते याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.  शेतकऱ्यांच्या मदतीचा निर्णय न झाल्यास पुढील महिन्यात सुरू होणारे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज रोखण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्यातून काही उपयोग होणार नाही. त्याऐवजी संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.
लोणीकर यांनी शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात खुलासा केला असला तरी तीन वेगवेगळ्या निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात वेगळी का माहिती दिली, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. लोणीकर यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.