राज्याच्या विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील असंच काहीसं वातावरण दिसून येत आहे. एकीकडे भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाबाहेर प्रतीसभागृह भरवलं असताना सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाकडून गंभीर मुद्दे मांडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी यावेळी बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. “२०१६-१७मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला. मी खासदार होतो, त्यामुळे माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काही कारण नव्हतं. पण माझा फोन टॅप केला आणि माझं नाव ठेवलं गेलं अमजद खान”, असं नाना पटोले यावेळी सभागृहात म्हणाले. तसेच, आपल्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पीए, तसेच खासदार संजय काकडे यांचा देखील फोन टॅप करण्यात आला असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सुसंस्कृत लोकही हे करत असतील कर माहिती नाही”

“मी खासदार होतो. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं कारण काही नव्हतं. पण मला मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव ठेवण्यात आलं होतं अमजद खान. केंद्रातले सध्याचे मंत्री दानवे यांच्या पीएचा नंबर देखील टॅप केला गेला. खासदार संजय काकडेंचा नंबर टॅप केला गेला. अशी खूप नावं आहेत. त्यांच्याच लोकांचे देखील फोन टॅप केले गेले. कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही. धर्मातही हेच म्हटलं आहे की कुणाच्या गोष्टी आपण ऐकल्या तर ते पाप असतं. आता सुसंस्कृत लोकं असं राजकारण करत असतील तर माहिती नाही”, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

मुसलमानांची नावं का टाकली?

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी आपल्याला मुसलमानांचंच नाव (अमजद खान) का टाकलं? यावर आक्षेप घेतला. “मुसलमानांचीच नावं का टाकली? सरळ माझंच नाव टाकायला हवं होतं. या पद्धतीने हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून धर्माच्या नावाने राजकारण करून राज्य पेटवायचं हा उद्देश होता का?” असा सवाल त्यांनी केला.

“माझ्यावर अंमली पदार्थांच्या व्यवसायाचा आरोप”

“हे फोन टॅपिंग करण्याची गरज काय? याच्यामागे कोण आहे? २०१७-१८ च्या काळात पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे फोन टॅप केले गेले. कुणाच्या आदेशाने हे झाले? साखर कारखान्यांबद्दल तक्रारींची मोहीम सुरू आहे. गडकरी साहेबांची देखील तक्रार केली आहे. त्यांचेच लोक आता पत्र देत आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती गृहमंत्र्यांनी आम्हाला द्यावी. आमच्यावर आरोप लावले की ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय करत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला. किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती हवी. याचे सूत्रधार कोण आहेत? याला शासनाची मान्यता घ्यावी लागते”, अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

देशमुख, भुजबळ करून टाकू अशी धमकी…

“काल सभागृहात आपण पाहिलं की भास्कर जाधवांना एक सदस्य सांगत होते की तुम्ही बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करून टाकू. बाहेर सांगतात भुजबळ करून टाकू. अशी धमकी या सभागृहात कशी दिली जाते? कालच्या घटनेत गुंड प्रवृत्ती दिसून आली. राजू सापते नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. ज्या संघटनेची व्यक्ती यात पकडली गेली, त्या संघटनेचा अध्यक्ष भाजपाचा आमदार आहे. त्यांचं नाव देखील समोर आलं पाहिजे”, असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले.

उच्चस्तरीय चौकशी होणार

दरम्यान, मागील काळात करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सभागृहाला त्याची माहिती देण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress chief nana patole alleges phone tapping name amjad raosaheb danve pa sanjay kakade pmw
First published on: 06-07-2021 at 12:04 IST