प्रशासकीय कामांवरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केलेले लक्ष्य किंवा नियमबाह्य कामे करणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार यांना दिलेले प्रत्युत्तर यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतील कटुता वाढली असली तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत उभयतांना परस्परांची गरज असल्याने कितीही आरोप-प्रत्यारोप झाले तरीही तुटेपर्यंत ताणले जाणार नाही. अर्थात या वादात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे जास्त नुकसान होणार आहे.
राज्यातील राजकीय वातावरण काँग्रेस-राष्ट्रवादीला तेवढे अनुकूल नाही. त्यातच सर्वच जनमत चाचण्यांमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने २००४ आणि २००९ च्या निवडणुकांपूर्वी आघाडीवरून राष्ट्रवादीने काहीशी ताठर भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेसला नमते घ्यावे लागले होते. अगदी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत २० जागा जास्त मिळूनही राष्ट्रवादीच्या कलानेच खात्यांचे वाटप झाले होते. यंदा मात्र राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच काहीशी मवाळ भूमिका घेतली. आघाडी कायम ठेवताना गेल्यावेळचा जागावाटपाचा निकष कायम ठेवला.
राष्ट्रवादीचे १० ते १२ खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य आहे. अशा वेळी राष्ट्रवादीला काँग्रेसच्या मदतीची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात असल्यास काँग्रेसची पारंपारिक मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळतात. यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या मतांबरोबरच राष्ट्रवादीची मते हे गणित जमले तरच लोकसभेत विजय मिळविणे राष्ट्रवादीला शक्य आहे. विविध घोटाळ्यांमुळे काँग्रेस देशभर बदनाम झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे नागरी भागांमध्ये काँग्रेससासाठी तेवढे सोपे नाही. कारण गेल्या वेळी शहरी भागाने काँग्रेसला साथ दिली होती. राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसलाही राष्ट्रवादीच्या मतांची गरज भासते. अशा राजकीय परिस्थितीत उभयतांना एकमेकांची गरज आहे. त्यातच काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व नेहमीच शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व देते. आघाडीतील जागावाटपावरून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असताना मुख्यमंत्री चव्हाण यांनी मात्र या वादापासून दूर राहण्यावर भर दिला होता. अलीकडे शरद पवार आणि चव्हाण यांच्यात चांगलेच सख्य झाल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा होत असे. मात्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. कोणतीही नियमबाह्य कामे करणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतल्याने या वादात राष्ट्रवादीला अधिक फटका बसणार आहे. कारण वैयक्तिक हिताची कामे होत नसल्याचे पवार यांनी प्रशासनाला लकवा लागल्याची टीका केल्याचे चित्र मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून समोर आले आहे. हे सारे राष्ट्रवादीसाठी त्रासदायक ठरणारे आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यावर काँग्रेसच्या आघाडीवर सामसूमच होती. काँग्रेसचा एकही मंत्री वा बडा नेता मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी पुढे आला नाही ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही.