तटस्थ राहण्याचा मनसेचा निर्णय, तसेच दुसऱ्या पसंतीची मते कोणालाही न देण्याची शिवसेनेची भूमिका विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासाठी फायदेशीर ठरली आणि काँग्रेसला ही जागा कशीबशी कायम राखता आली.
शिवसेनेचे रामदास कदम ८६ मते मिळवून पहिल्या फेरीतच विजयी झाले. दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप यांना ५८ तर राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांना ५५ मते मिळाली. उर्वरित दोघांना ६६.३४ मतांचा कोटा पूर्ण न करता आल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात कदम यांना मिळालेल्या मतांपैकी तीन तसेच प्रसाद लाड यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीची तीन अशी सहा मते काँग्रेसच्या जगताप यांना मिळाली आणि ते विजयी झाले.
काँग्रेसला पराभूत करण्याकरिता शिवसेनेने दुसऱ्या पसंतीची सर्व मते लाड यांना दिली असती तरी काँग्रेससाठी ही जागा कायम राखण्यात कठीण गेले असते. कारण शिवसेनेकडे अतिरिक्त मते होती. शिवसेनेने नगरसेवकांना दुसऱ्या पसंतीची मते देऊ नये, अशा सूचना केल्या होत्या. भाजपच्या पाठिंब्यावर लाड विजयी होणे शिवसेनेसाठी सोयीचे नव्हते. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या सदस्यांची दुसऱ्या पसंतीची मते जगताप यांना मिळाल्याचे सांगण्यात आले. तटस्थ राहण्याचा निर्णय मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्याने भाजपच्या उत्साहावर पाणी फिरले. मग राष्ट्रवादीच्या बंडखोराला पुढे करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता निर्माण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश आले. मुंबईतील राष्ट्रवादीच्या बंडखोरीमुळे सोलापूरमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीला धडा शिकविला.
काँग्रेसचे भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची ५८ मतेच मिळाली. काँग्रेसची ५१ तर राष्ट्रवादीची १४ व काही अपक्षांच्या पाठिंब्यामुळे प्रत्यक्षात जास्त मते मिळायला पाहिजे होती. पण राष्ट्रवादीची जवळपास १० मते लाड यांना मिळाल्याचा काँग्रेसचा संशय आहे. काँग्रेसचीही तीन ते चार मते फुटली असण्याची शक्यता आहे. कारण काही अपक्ष काँग्रेसबरोबर होते.

अशी पडली मते
* एकूण मते २३०, प्रत्यक्ष मतदान – २०१, बाद मते – दोन
*  विजयासाठी ६६.३४ मतांची आवश्यकता
* शिवसेनेचे रामदास कदम – ८६ मते (कोटा पूर्ण केल्याने पहिल्या फेरीतच विजयी)
* काँग्रेसचे भाई जगताप (पहिल्या पसंतीची ५८ मते)
* राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड (पहिल्या पसंतीची ५५ मते)
* रामदास कदम यांच्या दुसऱ्या पसंतीची तीन तर लाड यांच्या दुसऱ्या पसंतीची तीन अशी सहा मते जगताप यांना हस्तांतरित
* कदम आणि लाड यांच्या दुसऱ्या पसंतीच्या सहा मतांमुळे जगताप यांना एकूण ६४ मते
* मते मोजण्यास शिल्लक न राहिल्याने सर्वाधिक मते मिळालेले जगताप विजयी.