महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सकारात्मक संकेत मिळाले असून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र थेट नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही अशी भीती संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. राज्यात लवकरच पुन्हा एकदा निवडणूक होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली असून, भविष्यात शिवसेनेसोबत निवडणूक लढणार का ? असा सवाल त्यांनी आपल्याच पक्षाला विचारला आहे.

“सरकार कोण आणि कसं स्थापन करतंय हा प्रश्न महत्त्वाच नाही, तर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल ही शक्यता कोणीच नाकारु शकत नाही. राज्यात नव्याने होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहा. कदाचित २०२० मध्ये पुन्हा निवडणूक होईल. मग आपण त्यावेळी शिवसेनेसोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहोत का ?,” असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

याआधी संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करणं धोक्याचं पाऊल असल्याचं सांगत चेतावणी देण्याचा प्रयत्न केला होता.

राज्यातील सत्ता स्थापनेवरून वाद विकोपाला गेल्यानंतर शिवसेनेनं भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे संकेत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून दिले होते. राऊत यांच्या ट्विटनंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

“लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना (भाजपा आणि शिवसेना) तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे,” असं सावंत यांनी ट्विट करून सांगितल आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमचं समर्थन हवं असेल तर भाजपापासून विभक्त व्हावं लागले असं म्हटलं होतं. दुसरीकडे मल्लिकार्जून खरगे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र शिवसेनेसोबत जाण्यावर आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.