केतकी चितळेला दिलासा; २१ गुन्ह्यात अटक न करण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

कळवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केतकीला नुकताच जामीन मंजूर करण्यात आला होता.

केतकी चितळेला दिलासा; २१ गुन्ह्यात अटक न करण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी, अभिनेत्री केतकी चितळेला तिच्याविरोधात दाखल उर्वरित २१ गुन्ह्यांमध्ये अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने आज (सोमवार) उच्च न्यायालयात दिली. कळवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केतकीला नुकताच जामीन मंजूर करण्यात आला होता.

केतकीने अटकेला आव्हान देणारी याचिका केली होती –

केतकीला कळवा पोलिसांनी १४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर तिने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. ही याचिका प्रलंबित असतानाच केतकीने अटकेला आव्हान देणारी याचिका केली होती. तिच्या दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे दाखल असून तिला एकामध्ये नुकताच जामीन मंजूर झाला. परंतु तिच्याविरोधात अन्य गुन्ह्यांतही आम्ही तिला अटक करणार नाही, असे सरकारी वकील अरूणा पै यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांचे हे म्हणणे नोंदवून घेतले व प्रकरणाची सुनावणी १२ जुलै रोजी ठेवली.

पाहा व्हिडीओ –

बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे या आरोपांतर्गत तिच्यावर विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी