मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव पहाडी येथे ३५ मजली इमारत बांधली जात असून यात पहिल्यांदाच व्यायामशाळा, जलतरण तलावासारख्या सुविधा देण्यात येत आहेत. या पंचतारांकित इमारतीचे स्थापत्य काम (सिव्हील वर्क) आणि विद्युत कामे पूर्ण झाली आहेत. सध्या अंतर्गत कामे सुरु असून फेब्रुवारीअखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्चअखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळवण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे या ३५ मजली इमारतीतील ३३२ विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

पहाडी गोरेगाव येथे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व गटांसाठी मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती करण्यात आली आहे. अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसाठी २०२३ मध्ये सोडत काढून या घरांचा ताबा देण्यात आला आहे. मध्यम आणि उच्च गटासाठी ३३२ घरांचे काम सुरु आहे. म्हाडाकडून पहिल्यांदाच मुंबईत ३५ मजली इमारत बांधली जात आहे. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील इमारतीत जलतरण तलाव, व्यायामशाळा, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन बाल्कनी, उद्यान क्लब हाऊस अशा खासगी प्रकल्पांप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळे मंडळाच्या या घरांच्या सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सोडत काढली जाणार असे वाटत असतानाच मंडळाने निर्माणाधीन प्रकल्पासाठी सोडत काढत या घरांच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेल्यांची प्रतीक्षा संपुष्टात आणली.

२०२४ च्या सोडतीत ३५ मजली इमारतीतील उच्च गटासाठीच्या १०५ आणि मध्यम गटासाठीच्या २२७ अशा एकूण ३३२ घरांचा समावेश करण्यात आला होता. या घरांसाठीची सोडत आॅक्टोबर २०२४ मध्ये सोडत काढण्यात आली. मात्र घरे निर्माणाधीन असल्याने या घरांसाठीच्या विजेत्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आता मात्र दोन महिन्यात त्यांची ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे. कारण मुंबई मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३५ मजली इमारतीचे स्थापत्य काम आणि विद्युत काम पूर्ण झाले आहे. सध्या उद्वाहन बसविण्यासह काही अंतर्गत कामे सुरु आहेत. ती फेब्रुवारीपर्यंत संपवून इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल. ही परवानगी मिळाल्यानंतर म्हाडा प्राधिकरणाकडून निवासी दाखला मिळवला जाईल, असेही सुत्रांनी सांगितले. मार्चअखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत विजेत्यांना घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच म्हाडाचा पहिला पंचतारांकीत प्रकल्प पूर्ण होऊन विजेते हक्काच्या घरात राहायला जाण्यास सुरुवात होईल.