मुंबई : अंधेरी (पूर्व ) येथील कदमवाडी परिसरात साईलीला बिझनेस पार्कच्या मागे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान सोमवारी रात्री उशीरा या कामगाराचा मृतदेह सापडला.
अंधेरी पूर्व परिसरातील अंधेरी – कुर्ला मार्गावर एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पायाचे खोदकाम सोमवारी सायंकाळी सुरू असताना ही दुर्घटना घडली. खोदकाम सुरू असताना बाजूची माती मुसळधार पावसामुळे अचानक कोसळली आणि त्याखाली एक कामगार अडकला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.४३ च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, मुंबई महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील कर्मचारी, पोलीस व १०८ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराचा शोध घेण्याचे काम अग्निशमन दलातर्फे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री ११.४५ च्या सुमारास कामगाराचा मृतदेह सापडला. त्याला कुपर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत असून बांधकाम स्थळांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे दोन दिवसात विविध तीन दुर्घटनांमध्ये चार जण जखमी झाले. तर जोगेश्वरी येथे बांधकामाची परांची कोसळून दोन महिला जखमी झाल्या, त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. अंधेरी – कुर्ला मार्गावरीस ताकपाडा येथील ॲरेस्टल इमारत परिसरात सोमवारी सकाळी ११ वाजता झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली.
गोवंडी येथे रविवारी नारळाचे झाड अंगावर पडल्यामुळे एक व्यक्ती जखमी झाली. देवनार कॉलनी येथे खासगी जागेतील नारळाचे झाड पडले. शेजारच्या घरातून बाहेर येत असलेल्या व्यक्तीच्या अंगावर हे झाड पडले. अमीन शेख (४२) असे या व्यक्तीचे नाव त्यांच्या कमरेस आणि पायास मार लागला. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ त्यांना झेन रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ेजोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची परांची सोमवारी दुपारी १ वाजता कोसळली. या दुर्घटनेत २ महिला जखमी झाल्या. त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्लीन पॉल (५९) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुगंधा कदम (६३) यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले.