मुंबई : अंधेरी पूर्व येथील मरोळ परिसरातील चर्च रोड भागात नालेसफाईच्या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप एका सामाजिक संस्थेने केला आहे. या ठिकाणी बालकामगारांकडून नालेसफाई केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार वॉचडॉग फाऊंडेशनने छायाचित्रांसह उघड केला आहे. विशेष म्हणजे या कामगारांना, बालकामगाराला हातमोजे, बूट, मुखपट्टी असा कोणताही सुरक्षा गणवेश दिला नव्हता, असाही आरोप संस्थेने केला आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाई करण्यात येत आहेत. या कमांतर्गत पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व येथील मरोळ भागात नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप वॉचडॉग फाऊंडेशनने केला आहे. ही घटना केवळ मानवी हक्कांचे उल्लंघन नाही, तर बालकामगार प्रतिबंधक कायदा, कामगारांचे आरोग्य व सुरक्षेचे कायदे आणि न्यायालयीन आदेशांचेही सर्रास उल्लंघन आहे, असा आरोप वॉचडॉग फाऊंडेशनचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी केला आहे.
याबाबत पिमेंटा म्हणाले की, उच्च न्यायालयाने २००६ मध्ये नाल्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना संपूर्ण सुरक्षा साहित्य पुरवण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानंतर २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही हेच आदेश पुन्हा दिले. २०१३ मध्ये ‘हाताने मैला साफ करणारे कामगार म्हणून काम करण्यास मनाई व त्यांचे पुनर्वसन कायदा’ लागू करण्यात आला, ज्याअंतर्गत अशा धोकादायक व असुरक्षित पद्धतीने काम करवून घेणे पूर्णतः बेकायदेशीर आहे. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचा आरोप पिमेंटा यांनी केला आहे. न्यायालयीन आदेश, कायदे आणि मूलभूत मानवाधिकारांचा पालिकेचे ठेकेदार सर्रास उल्लंघन करीत आहेत. बालकामगारांकडून असे जीवघेणे काम करून घेणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असाही आरोप पिमेंटा यांनी केला आहे. या प्रकरणी पिमेंटा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
या प्रकाराची तातडीने चौकशी करण्यात यावी व घटनास्थळी भेट देण्यात यावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने आयोगाकडे केली आहे. तसेच अशा असुरक्षित पद्धतीने सुरू असलेले काम थांबवण्याचे आदेश द्यावेत आणि सर्व कामगारांना आवश्यक सुरक्षात्मक साहित्य देण्याचे निर्देश द्यावेत. बालकामगाराच्या सहभागाबाबत संबंधित बालसंरक्षण यंत्रणांना त्वरित सूचित करून कारवाई करावी. कामगारांना योग्य भरपाई, वैद्यकीय मदत व पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी. देशभरातील सर्व महापालिकांना यासंदर्भात सल्ला जारी करून हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध करण्याचे देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.