मुंबई : दादर मधील कबुतरखाना परिसरात दोन दिवसांपूर्वी पेटा या प्राणी व पक्ष्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेने लावलेली कबुतरखान्यांचे समर्थन करणारी जाहिरात वादग्रस्त ठरल्यानंतर जाहिरात काढून टाकण्यात आले आहेत. कबुतरांना जगण्याचा हक्क असल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. त्यामुळे कबुतरखाना परिसरातील नागरिकांनी या जाहिरातीला विरोध केला. त्यानंतर अखेर संबंधित जाहिरात हटवण्यात आली आहे. कबुतरांना खाद्य घालण्याच्या जुन्या परंपरेला विरोध करणाऱ्यांना ही जाहिरात जाणीवपूर्वक दुखावणारी वाटली होती.
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश विधान परिषदेत मुंबई महापालिकेला देण्यात आले होते. त्यामुळे दादर कबुतरखान्यासह मुंबईतील कबुतरखाने बंद करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच पालिकेने दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावर कारवाई करुन अनधिकृत बांधकाम हटवले आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य उचलले.
दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वी दादरमधील कबुतरखाना परिसरात संबंधित जाहिरात लावण्यात आली होती. आम्ही देखील मुंबईकर आहोत, अशा प्रकराची ती जाहिरात होती. ही जाहिरात समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली. त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. समाज माध्यमाद्वारे पेटाला याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी जाहिरात हटवण्यात आली.
विष्ठेतून पसरणारी बुरशी धोकादायक
कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परलिजस आणि क्रायकोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा आणि पंख प्रामुख्याने श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. यामुळे अलर्जी होऊ शकते. दमादेखील होण्याची शक्यता असते.