लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीतील दबावाचे राजकारण आणि कुरघोड्या सुरूच असून, दिवसभरात दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपांवरून सहमती होऊ शकली नाही. भाजपच्या दबावाच्या राजकारणामुळे आधीच असंतोष असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाची ताकदच नसल्याच्या नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून शिंदे गटात नाराजीची भावना आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पाच मतदारसंघांवरून निर्माण झालेला तिढा मंगळवारीही सुटू शकलेला नाही.

ठाणे, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडू नये, यासाठी शिंदे यांच्यावर दवाब वाढत आहे. एकीकडे ठराविक उमेदवारांसाठी भाजपचा दबाव व दुसरीकडे विरोधी वक्तव्ये यामुळे शिंदे गटातील नेते दुखावल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात कटुता निर्माण झाली असून राणे यांनी महायुतीचा धर्म पाळवा, असे शिंदे गटातील नेते सांगू लागले आहेत. यवतमाळ-वाशीमचा उमेदवार निश्चित करण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. यावेळी राणे यांनी केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पक्षाच्या नेत्यांच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घालण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. भुजबळ नाशिकमध्ये निवडून येण्याबाबत शिंदे गट साशंक आहे. दरम्यान, महायुतीमध्ये गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असलेल्या मतदारसंघांबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १२ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणाऱ्या मतदारसंघांबाबत पुढील दोन-तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>>माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

मविआचे जागावाटप ‘जैसे थे’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी या जागांवरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटलेला नाही. भिवंडीची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. पण त्याबदल्यात अन्य जागा मिळावी, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. सांगलीसाठी राज्यातील काँग्रेस नेते आग्रही असले तरी दिल्लीतील नेतृत्वाने यावर फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सध्या तरी मौन बाळगले आहे.