मुंबई: ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने गलिच्छ विधान केले.  अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे, वागणे ही आपली परंपरा नाही. सत्तेच्या केंद्रस्थानी  असलेल्या लोकांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात. जे काही घडले ते घृणास्पद होते. त्यावर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा स्पष्ट करणारी होती. यावर आता अधिक प्रतिक्रिया देऊ नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वादावर पडदा टाकला आहे.

राजकारणात सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी काहींनी तारतम्य पाळले नसले तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या, ही बाब आश्वासक आहे. त्याची नोंद घेणे गरजेचे आहे. जर कुणी चुकीचे बोलले असेल, कुणी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक अहे. तरीदेखील आपण या सगळय़ा प्रवृत्तींपासून दूर राहूयात. महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करूयात, असे आवाहन सुळे यांनी केले.

राज्यपालांकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदिती नलावडे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.