मुंबई : कूपर रुग्णालयात तीन डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. शनिवारी रात्री एका महिलेच्या घशात माशाचा काटा अडकल्याने तिला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विभाग प्रमुखांनी उपचारास नकार देऊन, तिला अन्य रुग्णालयात पाठवले. अशाच प्रकारे रविवारी सकाळी गंभीर स्थितीत आलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत असले तरी पुढील उपचारासाठी त्यांना अन्य रुग्णालयामध्ये पाठविण्यात येत आहे.
कूपर रुग्णालयामध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकरण शुक्रवारी रात्री घडले. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावरून कूपरमधील निवासी डॉक्टर आणि आंतरवासिता डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. मारहाणीच्या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ते दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. या प्रकारामुळे आंदोलनात सहभागी नसलेले आणि विभाग प्रमुख डॉक्टरही सेवा देण्यास घाबरत आहेत. परिणामी गंभीर स्थितीत येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत असले तरी त्यांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.
शनिवारी रात्री एका महिलेच्या घशामध्ये माशाचा काटा अडकला. त्यामुळे तिला कूपर रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावेळी संबंधित डॉक्टरने पुरेशा सुरक्षा अभावी आणि मारहाण होण्याच्या भीतीने आपत्कालीन विभागामध्ये येऊन उपचार करण्यास नकार दिला. यावेळी या महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले असले तरी पुढील उपचारासाठी तिला अन्य रुग्णालयामध्ये हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी अपस्मारचा त्रास सुरू झाल्याने तिला कूपर रुग्णालयात आणण्यात आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार करण्यास नकार देण्यात येत असल्याने तिच्या कुटुंबियांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र त्याचवेळी रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येतील असा विश्वासही उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात येत होता. मात्र डॉक्टरांच्या आंदोलनामुळे काही रुग्ण हे उपचारासाठी अन्य रुग्णालयामध्ये जात असल्याचे रविवारी दिसून आले.
आपत्कालीन विभागात सुरक्षा रक्षक तैनात डॉक्टरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर निवासी डॉक्टरांनी पुकारलेले आंदोलन यांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाने तातडीने रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये तीन पाळ्यांमध्ये मिळून १५ सुरक्षा रक्षक तैनात केले. तसेच डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर रुग्णसेवा कायम ठेवण्यात येणार आहे. रुग्णसेवा बाधित होणार नसल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली.
