लोकसत्ता खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

मुंबई : पोलीस हवालदाराच्या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच भायखळा येथे घडला आहे. गंभीर बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी मुलीने मोबाइलमध्ये दोन ध्वनीचित्रफीती बनवल्या आहेत. त्यात २६ वर्षीय तरूणाने कुटुंबियांसह आपल्याबद्दल अपशब्द उच्चारल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी २६ वर्षीय तरूणाविरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार पोलीस हवालदार पदावर कार्यरत असून सध्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांच्या २४ वर्षीय मुलीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण मुलीच्या आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या मोबाइलची तपासणी केली. त्यात मृत्युपूर्वी तिने स्वतःच्या दोन ध्वनीचित्रफीती तयार केल्याचे निदर्शनास आले. त्यात तिने आपल्या मृत्युला पराग डाकी (२६) याला जबाबदार धरले आहे. त्यानंतर भायखळा पोलिसांनी याप्रकरणी डाकीविरोधात तात्काळ भादंवि कलम ३०६ (आत्महत्येच प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या ध्वनीचित्रफीत डाकी हा माझ्याबद्दल अपशब्द बोलतो. वडिलांची बदनामी करतो, बहिणीला व आईबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतो. त्यामुळे आज आपले काही बरेवाईट झाल्यास त्याला पराग जबाबदार असल्याचे मुलीने म्हटले आहे.

दुसऱ्या ध्वनीचित्रफीतीमध्ये मी पराग डाकीमुळे आपले जीवन संपवत आहे. त्याने मला खूप वेदना दिल्या आहेत. त्याने माझा व कुटुंबियांचा अपमान केला. हे मी सहन करू शकत नाही. मी जीव देत असून काही बरे वाईट झाले, तर सगळे परागवरती येणार आहे. त्याने मला खूप त्रास दिला आहे, असे बोलून या मुलीने घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.