मुंबई : करोना, मेट्रो सेवा आणि कार्यालय स्थलांतराचा मोठा फटका पश्चिम रेल्वेला बसला असून करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेची उपनगरीय प्रवासी संख्या पूर्ववत होऊ शकलेली नाही. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून २०१९-२० मध्ये दररोज ३४ लाख ६७ हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र या वर्षात प्रवासी संख्येत नऊ लाखांनी घट झाली आहे. प्रवासी संख्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे कमी झाली, प्रवासी संख्या आणि उत्पन्नात वाढ कशी करता येईल याबाबत अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवरील विविध योजनांची माहिती देण्यासाठी अशोक मिश्र यांची चर्चगेट येथील मुख्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च २०२० पासून टाळेबंदी लागू झाली. सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद करण्यात आला होता. करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताच लोकल सेवा पूर्ववत झाली. मात्र लोकल प्रवाशांच्या संख्येत करोनापूर्व काळाइतकी वाढ झालेली नाही. २०१९-२० मध्ये दररोज ३४ लाख ६७ हजार प्रवासी लोकलने प्रवास करीत होते. २०२०-२१ मध्ये टाळेबंदी आणि प्रवासावरील निर्बंधामुळे प्रवासी संख्या सात लाख ७२ हजार इतकी होती. करोनाबाधितांची कमी झालेली संख्या आणि हटविण्यात आलेले निर्बंध यामुळे प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित होती. मात्र सध्या प्रतिदिन प्रवासी संख्या २५ लाख ६८ हजार इतकी असून प्रवासी संख्येत नऊ लाखांनी घट झाली आहे. त्यामुळे उत्पन्नही कमी झाले आहे.

हेही वाचा: खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”

पूर्ववत न झालेल्या प्रवासी संख्येबाबत अशोक मिश्र यांनी कारणमीमांसा केली आहे. करोनाकाळात काही जण आपापल्या परराज्यात परत गेले. तर काही खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अद्यापही घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतील खासगी कार्यालये वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी यासह अन्य भागात स्थलांतरित झाली आहे. मेट्रो सेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येवर झाला आहे, असे अशोक मिश्र म्हणाले.

हेही वाचा: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खार-गोरेगाव सहावी मार्गिका मार्च २०२३ पर्यंत
मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करणे, जलद लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई सेन्ट्रल – बोरिवलीदरम्यान पाचवी – सहावी मार्गिका उभारण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेने घेतला आहे. सध्या मुंबई सेन्ट्रल-बोरिवलीदरम्यानच्या माहीम आणि खारमधील पाचव्या मार्गिकेचे काम बाकी आहे. खार – बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका उपलब्ध आहे. तर मुंबई सेन्ट्रल-बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून यापैकी खार – गोरेगाव पहिला टप्पा मार्च २०२३ पासून आणि बोरिवलीपर्यंत पूर्ण मार्गिका २०२४ पर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस आहे. या मार्गिकांसाठी ९५ टक्के भूसंपादन झाल्याचे मिश्र यांनी सांगितले.