ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेची खबरदारी

मुंबई : करोनाच्या चाचण्या वाढविण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारने दिल्यानंतर महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. परिणामी मागील दोन दिवसांत शहरात प्रतिदिन ३५ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत.

शहरात नोव्हेंबरपासून करोना संसर्गाचा प्रसार कमी होत गेला तसा पालिकेच्या दैनंदिन चाचण्यांमध्येही घट होत गेली. नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर काही दिवस ३८ हजार चाचण्या प्रतिदिन केल्या गेल्या. या काळात सुमारे अडीचशे नव्या रुग्णांची दरदिवशी भर पडत होती. संसर्गप्रसार कमी झाल्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात पालिकेच्या चाचण्यांचा आलेख सरासरी ३० हजारांपर्यंत खाली आला. परिणामी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही दोनशेच्या खाली आली.

ओमायक्रॉनचे संकट नोव्हेंबरच्या शेवटी घोंघावू लागले तसे केंद्र आणि राज्य सरकारने चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले. यानंतर नाताळच्या सुट्टीमुळे मुंबईत दरदिवशी हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या प्रवासी आणि ओमायक्रॉनची भीती यामुळे आता पालिकेनेही चाचण्यांची संख्या मागील दोन दिवसांत वाढविली आहे. ३० नोव्हेंबरला सुमारे ३७ हजार तर १ डिसेंबरला शहरात ३६ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे प्रतिदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही पुन्हा दोनशेच्या वर गेली आहे.

मुंबईत आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी नऊ जण बाधित असल्याचे आढळले आहे. याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविले आहेत. यातील सहा प्रवाशी नोव्हेंबरमध्ये तर तीन प्रवाशी डिसेंबरमध्ये मुंबईत दाखल झाले आहेत. पाच प्रवासी ब्रिटनमधून तर दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल, जर्मनी आणि मॉरिशस या देशांमधून प्रत्येकी एक प्रवासी दाखल झाला आहे.

रुग्णसंख्या अधिक असलेले विभाग..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात अंधेरी (पश्चिम), वांद्रे (पश्चिम), चेंबूर आणि भायखळा या भागांमध्ये सध्या अधिक संख्येने रुग्ण आढळत आहेत. सध्या शहरात १८ इमारती प्रतिबंधित असून यात सर्वाधिक चार इमारती अंधेरी पश्चिम आणि भायखळा भागात आहेत.