मुंबईत ९२ लाखांवर नागरिकांचे लसीकरण

मुंबई : मुंबईमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे लक्ष्य पालिकेने शनिवारी पूर्ण केले. शनिवारी लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले. मात्र तरीही मुंबईतील लसीकरण असेच सुरू राहणार असून नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई महानगरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे निर्धारित लक्ष्य शनिवारी सकाळच्या सत्रात  गाठले.  मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण मिळून हे १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यात आले आहे.

दरम्यान, या लसीकरणात मुंबईबाहेरील नागरिकांचा देखील समावेश असल्यामुळे प्रत्यक्ष काही मुंबईकर नागरिकांनी अद्याप पहिली मात्रा घेतली नसल्याची शक्यता गृहीत धरून लसीकरण असेच सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईत लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मग तो मुंबईबाहेरचा असला तरी त्यांना लस दिली जात होती. लोकांनी स्वत:हून लसीकरणासाठी पुढे यावे हा आमचा हेतू असून लसीकरण सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चिात करून दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिली मात्रा घेतल्याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेत स्थळावर झाली आहे. म्हणजेच पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर दिवसभरात १ लाख १८ हजार २३७ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३९,३५७ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली.

मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याचा टप्पा १० नोव्हेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला.  त्यापाठोपाठ आता पहिल्या मात्रेचे लक्ष्यांक गाठून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.