सर्वच स्थानकांच्या प्रवेशमार्गात ठाण, प्रवाशांना अडथळे

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
dombivli railway station marathi news, mp shrikant shinde marathi news
डोंबिवली रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांच्या बाकांना रंग फासला, आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी रेल्वेची कृती

मुंबई : करोना र्निबधांच्या काळात मोकळय़ा दिसणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात आता पुन्हा फेरीवाल्यांची भाऊगर्दी दिसू लागली आहे. रेल्वे स्थानकांच्या प्रवेशमार्गावरच पथारी मांडून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे. फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई होत असल्याचा रेल्वे आणि पालिका प्रशासनाचा दावाही फोल ठरत आहे.

गतवर्षी १५ ऑगस्टनंतर दोन लसमात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यामुळे सध्या दररोज मध्य रेल्वेवर ३५ लाख, तर पश्चिम रेल्वेवर साधारण २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. करोनाकाळात घातलेले र्निबध        शिथिल होताच प्रवासी संख्या वाढू लागली असून स्थानके, फलाट प्रवाशांनी गजबजले आहेत. अशातच फेरीवाल्यांनी जागा अडवून व्यवसाय मांडल्याने गर्दीत भर पडत आहे. गर्दीच्या वेळी स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर येणाऱ्या प्रवाशांना गर्दीलाही सामोरे जावे लागते.

रेल्वे हद्दीत तसेच लोकल आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये फेरीवाले आढळल्यास त्यांच्यावर रेल्वे सुरक्षा दलाकडूनही कारवाई केली जाते. मध्य रेल्वेने मुंबई विभागात २०२१ मध्ये ६,३६५ फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ७३ लाख ६४ हजार ६९५ रुपये दंड वसूल करण्यात आला. यापैकी १३ जणांना तुरुंगात जावे लागले. जानेवारी २०२२ मध्ये ८१४ फेरीवाल्याकडून ९ लाख ४० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर दोघांना कारागृहात जावे लागले.

पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील स्थानक परिसरामध्ये एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या काळात कारवाईच करण्यात आली नाही. एप्रिल २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत २२ अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ११ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुमारे ६,७०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

कुर्ला : सदैव गर्दीने गजबजलेल्या कुर्ला स्थानक परिसरात फेरीवाले आणि वाहने यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. कुर्ला पूर्वेला रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते.  कुर्ला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा पादचारी पूल अडीच वर्षांपासून अर्धवट तोडून ठेवला आहे. परिणामी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे पुलाचा वापर करीत असल्याने तेथेही मोठी गर्दी होते. अशीच परिस्थिती कुर्ला पश्चिमेलाही आहे. पूर्वेपेक्षा पश्चिम परिसरात कायम फेरीवाल्यांचा गराडा असतो.

यंत्रणांचे म्हणणे

‘रेल्वे हद्दीत वावरणाऱ्या फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. दंड न भरल्यास त्यांना तुरुंगातही जावे लागते. रेल्वे स्थानक प्रवेशद्वारांना लागूनच असलेल्या पालिकेच्या हद्दीतील फेरीवाले असल्यास त्याबाबत पालिकेला माहिती देण्यात येते. फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात येते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले तर, गेल्या दोन आठवडय़ांपासून रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाईला सुरुवात केल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.

चर्चगेट, सीएसएमटी

स्थानकाचा ईरॉस चित्रपटगृहासमोरील भुयारी मार्ग आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारा आराम हॉटेल समोरील भुयारी मार्ग सदैव फेरीवाल्यांनी कोंडलेले असतो. प्रवेशद्वारापासून स्थानकाच्या जिन्यापर्यंत फेरीवाले ठाणे मांडून बसतात. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण बनले आहे. 

घाटकोपर

स्थानकाच्या पश्चिमेला फलाट क्रमांक एकवरील प्रवेशद्वाराला खेटूनच बसलेल्या फेरीवाल्यांमुळे हा प्रवेशमार्ग आक्रसला आहे. त्यातच मोठय़ा प्रमाणात रिक्षाही उभ्या असल्याने त्यातून वाट काढून प्रवाशांना स्थानकात प्रवेश करावा लागतो. या स्थानकाच्या मधल्या मोठय़ा पुलावरून पूर्वेला पादचारी पुलावरून उतरल्यानंतर समोरच उभे असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे अडचणी येत आहेत.

दादर

या स्थानकातील पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक एकच्या बाहेरच अनेक फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. प्रवेशद्वारांजवळच विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारे फेरीवाले उभे असतात. त्यातच दादर फूलबाजारातही विक्रेते खेटूनच असल्याने प्रवेशद्वारातून ये-जा करताना अनंत अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो.