करोनाचं संकट हे गंभीर आहे. या संकटाचा जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. अगदी ट्रम्पपासून मीच काय महापौर अन् सरपंचापर्यंत कोणालाही या करोनानं सोडलं नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना विषाणूंच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेण्याचं आवाहन राज्याच्या जनतेला केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज रात्री १२ वाजल्यापासून राज्यामध्ये कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा केली आहे.
आज मध्यरात्रीपासून राज्यात कलम १४४ लागू लागू करीत आहोत. आज मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाहीत. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. “हे संकट खूप मोठं आहे. आपल्याला मिळून याचा सामना करायचा आहे. सरकारने मागील काही दिवसांमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. दहावीच्या परिक्षाही पुढे ढकलल्या आहेत. परिक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी ही परीक्षा आपल्याला सर्वांना एकत्र मिळूनच द्यावी लागणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलता येणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवस सर्वांना खबरदारी घेणे महत्वाचं आहे. करोनाच्या संकटाचा फटका अनेक देशांना बसला आहे. मीच काय अगदी ट्रम्पपासून ते सरपंच आणि महापौरांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसला आहे,” असं मत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना व्यक्त केलं.
माणुसकी जपा
हातावर पोट असणाऱ्यांचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. “मी आधीही सांगितलं होतं आताही सांगेन की माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. “जीव हा सर्वात महत्वाचा आहे. तो असला तर बाकी सर्व करता येईल. त्यामुळे इतरांचीही काळजी करा,” असंही मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.