मुंबईतील ८३ टक्के करोना रुग्णांमध्ये करोनाची लक्षणं दिसत नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. “मुंबईत बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचं कळत आहे. यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. मुंबईतील ८३ टक्के लोकांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे लक्षणं नसलेल्या अशा करोना रुग्णांना त्यांच्या घरीसुद्धा क्वारंटाइन केलं जाऊ शकतं असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना जर कडक पद्धतीने क्वारंटाइन केलं तर चालेल असं आयुक्तांनीही सांगितलं आहे. जेणेकरुन बेड उपलब्ध होतील,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मुंबईत डबलिंगचा रेट जो सात होता तो १० झाला आहे. देशाच्या सरासरीपेक्षा मुंबईत सुधारणा झाली आहे.  मृत्यू दर जो पाच होता तो साडे तीनपर्यंत आला आहे. मुंबईत मत्यू दरही कमी होत आहे. मुंबईमधील परिस्थितीत सुधारणा झाली आहे. कितीही मोठी वाढ झाली तरी त्यादृष्टीने आपण तयारी केली आहे”.

दरम्यान यावेळी त्यांनी मुंबईमधील लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळालं असल्याची माहिती दिली. राजेश टोपे यांनी सांगितलं की, “लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे”.


करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या (राज्यवार) 

राज्यमृत्यू
महाराष्ट्र400
गुजरात181
मध्य प्रदेश120
दिल्ली54
राजस्थान52
आंध्र प्रदेश31
उत्तर प्रदेश34
तेलंगणा26
तमिलनाडू25
कर्नाटक20
पश्चिम बंगाल22
पंजाब19
जम्मू कश्मीर08
हरयाणा05
केरल03
झारखंड03
बिहार02
हिमाचल प्रदेश02
आसाम01
मेघालय01
ओडिशा01
पुद्दुचेरी01
एकूण 1011

(स्रोत – https://www.mygov.in/covid-19)