मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा खर्च ३७ हजार २७६ कोटींवर गेला आहे. खर्चात वाढ झाल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) अतिरिक्त कर्ज घ्यावे लागले जायकाने अतिरिक्त ४६५७ कोटीचे कर्ज देऊ केले आहे. हा कर्जाचा शेवटचा टप्पा असून त्यासाठी नुकताच केंद्र सरकार आणि जायकामध्ये करार झाला आहे. जायकाकडून मेट्रो ३ ला अर्थसहाय्य दिले जात असतानाच जायकाने एमएमआरसीच्या वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेलाही अर्थबळ देण्याची तयारी दर्शवली आहे.

एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेची बांधणी केली जात आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी रुपये असा होता. पण आरे कारशेडचा वाद, वृक्षतोड आणि इतर अनेक तांत्रिक अडचणीमुळे ही मार्गिका वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात आधी १० हजार कोटींनी आणि नंतर पाच हजार कोटींनी वाढ होऊन प्रकल्प खर्च ३७ हजार २७६ कोटींवर गेला आहे. दरम्यान या मार्गिकेसाठी जायकाकडून कर्ज उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच खर्च वाढल्याने अतिरिक्त कर्जाची गरजही निर्माण झाली आहे.

हेही वाचा…“आता फक्त दाऊदला क्लीन चिट…”, रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊत यांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो ३ साठी आता एमएमआरसीएलला एकूण खर्चाच्या ५७ टक्के अर्थात ५७.०९ टक्के अर्थात २१,२८० कोटी रुपयांचे कर्ज आवश्यक आहे. आतापर्यंत चार टप्प्यात जायकाने कर्ज दिले आहे. तर शेवटच्या टप्प्यात ४६५७ कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे. त्यानुसार आता ही रक्कम कर्जरूपाने एमएमआरसीएल उपलब्ध होणार आहे. यासाठीच्या करारावर केंद्र आणि जायकाकडून स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे आता एमएमआरसीएलची अतिरिक्त निधीची अडचण दूर झाली आहे. आता ही मार्गिका लवकरात लवकर पूर्ण करून ती वाहतूक सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न एमएमआरसीएलचा आहे. दरम्यान जायकाने मेट्रो ११ लाही अर्थसहाय्य देण्याची तयारी दर्शविली आहे. मेट्रो ११ मार्गिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) होती. मात्र राज्य सरकारने ती एमएमआरसीएलकडे वर्ग केली आहे. या मार्गिकेची उभारणी एमएमआरसीएलकडून केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. असे असताना या मार्गिकेतील निधी उभारणीही सोपी होणार आहे. कारण जायकाने मेट्रो ११ साठी कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे.