मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांची या पदासाठीची निवड योग्य नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला. कुलगुरूंच्या पदासाठी आखून देण्यात आलेले शिक्षणाचे आणि अन्य निकष डावलून वेळूकर यांची चुकीच्या पद्धतीने निवड करण्यात आल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले. यापूर्वी स्वत:विषयी चुकीची माहिती पुरविल्याच्या मुद्द्यावरून वेळूकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. विद्यापीठाचे माजी कुलगुरू ए. डी. सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात हा निकाल देण्यात आला. कुलगुरूपदावरील व्यक्ती प्राध्यापक आणि संशोधक असावी, अशी प्रमुख अट आहे. मात्र आघाडी सरकारच्या काळात हे सर्व निकष पायदळी तुडवून राजन वेळूकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचा युक्तिवाद ए. डी. सावंत यांच्या वकिलाने न्यायालयात केला.