मुंबई : राज्यात करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून, काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले. 

राज्यातील दैनंदिन करोना रुग्णसंख्या एक हजाराहून कमी झाली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्याही १० हजारांखाली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये करोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, मुखपट्टीची सक्ती काढून टाकण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नसून पूर्ण विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यात ७८२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात रविवारी करोनाच्या ७८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून दिवसभरात १,३६१ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,२२८ इतकी झाली आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ४,६२९ इतकी झाली आहे. त्यापैकी ४,४५६ रुग्णांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी नकारात्मक आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्यात गेल्या २४ तासांत मुंबई येथे १०३, ठाणे शहर १७, कल्याण-डोंबिवली ५, नवी मुंबई २१, नाशिक १८, पुणे ५५, पुणे शहर १४४, पिंपरी चिंचवड ४६, नागपूर ३५ इतके नवे रुग्ण आढळले.