मुंबई : भारतीय नाट्यचळवळीतील प्रसिद्ध नावांपैकी एक असलेले मणिपूरमधील सर्जनशील नाटकककार, दिग्दर्शक, लेखक व कवी रतन थिय्याम यांचे दीर्घ आजाराने बुधवार, २३ जुलै रोजी निधन झाले. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी इम्फाळ येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना इम्फाळ येथील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन थिय्याम यांचा जन्म २० जानेवारी १९४८ रोजी मणिपुरमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड होती. थिय्याम हे पारंपरिक मणिपुरी कलाप्रकारांना समकालीन कला, नावीन्यपूर्णता आणि काव्यात्मक कथांचा साज चढवून सादर करण्यासाठी ओळखले जायचे. १९७० च्या दशकात भारतीय रंगभूमीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव होता, तेव्हा भारतीय नाट्यसृष्टीतील ‘थिएटर ऑफ रूट्स’ चळवळीला नवीन आकार देण्याचे काम करीत त्यांनी भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि पारंपरिक कलाप्रकारांना रंगमंचावर पुन्हा सादर करण्यावर भर दिला. त्यांच्या नाटकात कथेच्या पलीकडे अत्यंत कल्पकतेने वापरलेले संगीत, विविध दृष्ये आणि संवाद लक्षवेधी ठरले. त्यांच्या नाटकांनी सामाजिक संदेश देण्यासह सांस्कृतिक आत्मा प्रतिबिंबित केला.
रतन थिय्याम यांच्या करणभरम (१९७९), इम्फाळ इम्फाळ (१९८२), चक्रव्यूह (१९८४), लेंगशोनेई (१९८६), उत्तर प्रियदर्शी (१९९६), चिंगलोन मॅपन टम्पक अमा, ऋतुसंहारम,अंध युग, वाहूदोक, आशिबागी एशेई, लायरेम्बिगी एशेई, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘राजा’ (१९१०) या नाटकावर आधारित ‘द किंग ऑफ डार्क चेंबर’ ही त्यांची नाटके लक्षवेधी ठरली. थिय्याम यांच्या प्रत्येक नाटकातून रंगभूमीवर महत्वपूर्ण विचार स्पंदने उमटली आणि अगदी ज्येष्ठ कलावंतांनाही विचार करण्यास भाग पाडले. त्यांची नाटके आंतरराष्ट्रीय मंचावरही सादर झाली. पर्यावरणीय संकटापासून ते मणिपूरच्या सामाजिक-राजकारणापर्यंतचे विषय त्यांच्या नाटकांमध्ये होते. त्यांनी १९७६ साली इम्फाळस्थित ‘कोरस रेपर्टरी थिएटर’ नावाच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली होती.
थिय्याम हे राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा – एनएसडी) पदवीधर झालेले मणिपूरमधील पहिले व्यक्ती होते. त्यांनी १९८७ ते १९८८ पर्यंत ‘एनएसडी’चे संचालक म्हणूनही काम पाहिले आणि त्यानंतर २०१३ ते २०१७ या काळात अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. तसेच संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. त्यांना १९८७ मध्ये दिग्दर्शनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच १९८९ साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच इंडो-ग्रीक मैत्री पुरस्कार (ग्रीस),एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवाकडून फ्रिंज फर्स्ट्स पुरस्कार, सर्व्हेंटिनो आंतरराष्ट्रीय महोत्सवाकडून डिप्लोमा (मेक्सिको), कालिदास सन्मान, जॉन डी. रॉकफेलर पुरस्कार, भरत मुनी सन्मान, संगीत नाटक अकादमी फेलोशिप (अकादमी रत्न), भूपेन हजारिका फाउंडेशन पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
दरम्यान, मैतेई – कुकी समाजातील संघर्ष थांबविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२३ साली एक शांतता समिती स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. त्यामध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासह रतन थिय्याम आणि ५० जणांचा समावेश होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैतेई – कुकी समाजातील संघर्षावर व्यक्त होऊन प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची वेळ आली आहे ,असे सांगून थिय्याम यांनी शांतता समितीत सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.