लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : मतदान केंद्रात मतदान करताना केलेल्या चित्रिकरणप्रकरणी संबंधिताविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मतदान यंत्रावरील महिला उमेदवाराच्या छायाचित्राकडे अश्लील हातवारे करताना केलेले चित्रीकरण व्हॉट्सॲप ग्रुपवर अपलोड केल्याचा आरोप आहे. ते समजल्यानंतर महिला उमेदवाराच्या कार्यकर्त्याने याप्रकरणी भायखळा पोलिसांकडे तक्रार केली.

मोहम्मद ताहिर सिद्धीकी याच्याविरोधात अश्लील कृती करणे, बदनामी करणे व पोलीसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी विविध कलमांतर्गत गुरूवारी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याला एका परिचित व्यक्तीने या चित्रफीतीबाबतची माहिती दिली. त्यानुसार त्याने भायखळा पोलिसांकडे तक्रार केली.

आणखी वाचा-स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रशासकीय सेवेबाबत थेट अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

तक्रारीनुसार, माय बेस्ट फ्रेन्ड या व्हॉट्स ॲप ग्रुपवर मोहम्मद ताहिर सिद्धिकीने एक व्हिडिओ पाठवला होता. आरोपी मोहम्मद ताहिर सिद्धीकीने मतदान करताना स्वतःचे चित्रीकरण केले आहे. मतदान यंत्रावरील महिला उमेदवाराच्या छायाचित्राकडे पाहून तो अश्लील हातवारे करीत असल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.