लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सध्याच्या स्पर्धात्मक जगात बहुसंख्य तरुण – तरुणींचा स्पर्धा परीक्षा देण्याकडे कल वाढू लागला आहे. परंतु स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, नेमका किती आणि कसा अभ्यास करणे आवश्यक आहे, विविध क्षेत्रांसह दैनंदिन घडामोडींची माहिती कशी जाणून घ्यायची, दिवसभरातील वेळेचे गणित कसे जुळवावे, शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य कसे जपावे, ताण कसा हाताळायचा, स्वतःची पडताळणी करून आत्मविश्वास कसा ठेवायचा आदी विविध गोष्टींबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (२५ मे) व आयएएस अधिकारी मनुज जिंदल (२६ मे) विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून स्वतःचा प्रवासही मांडणार आहेत. माटुंगा (प.) येथील दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थीदशेत परीक्षा, निकाल, प्रवेश प्रक्रिया आणि नवीन अभ्यासक्रमाबाबत काहीसे दडपण असते. विशेषतः दहावी – बारावीनंतर करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेऊन अभ्यासक्रमाची निवड कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. तसेच, यादरम्यान विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचेही वेध लागलेले असतात. या परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारीही सुरू होते. परंतु स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी ही नियोजनबद्ध कशी असावी, याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी कल्पना नसते. या प्रवासात अनेकदा विद्यार्थ्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते २५ मे रोजी आणि आयएएस अधिकारी मनुज जिंदल २६ मे रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आणखी वाचा- परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधि

तेजस्वी सातपुते या २०१२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि मार्चमध्ये मुलाखत होऊन मे २०१२ मध्ये तेजस्वी सातपुते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षे प्रशिक्षण घेऊन २०१४ पासून पोलीस खात्यात रुजू झाल्या. प्रथम परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक झाल्या. नंतर सीआयडीमध्ये, पुण्यात उपायुक्त (वाहतूक नियंत्रण), साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक, सध्या त्या मुंबईत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर सर्वात मोठ्या पोलीस भरतीचे आव्हान त्यांनी पेलले. कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून त्या परिचित असून पोलीस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख बनविण्यासाठी त्यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे समाजामध्ये पोलीस दलाच्या प्रतिमेबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्यही उंचावले. तेजस्वी यांना २०२३ च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

मनुज जिंदल हे २०१७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला म्हणजे एनडीएमध्ये यूपीएससीच्याच माध्यमातून प्रवेश मिळवला होता. त्यांनी पहिले सहा महिने उत्तमरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, नंतर त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून दोन वर्षे नोकरीही केली. त्यानंतर मनुज यांना वडिल आणि भावामुळे भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यानुसार, २०१४ साली त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली आणि २०१६ साली यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मनुज जिंदल यांनी गडचिरोली येथील भामरागड येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि परिविक्षाधीन अधिकारी (पीओ) म्हणून काम पाहिले. करोना काळात या भागात काम करताना महाराष्ट्रातील नक्षल भागात लस मोहीम राबविण्यासाठी मनुज जिंदल यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी जालना येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले. सध्या ते ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते ‘Manuj Jindal IAS’ या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ते यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात.

आणखी वाचा-मुंबई : मेंदूमध्ये रक्तस्राव झालेल्या महिलेवर ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ पद्धतीने शस्त्रक्रिया

विविधांगी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात विविध क्षेत्रांतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. या काळात विद्यार्थी व पालकांमधील संवादही महत्त्वाचा ठरतो. या ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते घट्ट होऊन कसा मनमोकळा संवाद झाला पाहिजे याबाबत २५ मे रोजी डॉ. हरीश शेट्टी व २६ मे रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींमध्ये आमूलाग्र बदल घडून स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतील ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत ‘युट्यूब – समाजमाध्यमे’ या विषयावर सुकीर्त गुमास्ते, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करणार आहेत. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख विवेक वेलणकर करून देणार आहेत. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर मार्गदर्शन करणार आहेत. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन संवाद साधणार आहेत.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधी ?

शनिवार, २५ मे आणि रविवार, २६ मे रोजी

कुठे ?

दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्य मंदिराच्या मागे, माटुंगा (पश्चिम)

केव्हा ?

सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

२५ मे : http://tiny.cc/LS_MargYashacha_25May

२६ मे : http://tiny.cc/LS_MargYashacha_26May

मुख्य प्रायोजक – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक – सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हीलियन अकॅडमी,

संकल्प आय. ए. एस. फोरम, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर – युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय – ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट