परमबीर यांच्याविरोधात पहिले आरोपपत्र ;गोरेगाव खंडणी प्रकरणात वाझेसुद्धा आरोपी

 गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाने खंडणीचा आरोप केला होता

मुंबई: गृहरक्षक दलाचे निलंबित महासंचालक परमबीर सिंह, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. सिंह यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस, ठाणे पोलीस व राज्य गुन्हे अन्वेषण विभागात(सीआयडी) मिळून ५ गुन्हे दाखल आहेत. त्यातील हे पहिले आरोपपत्र आहे.

सिंह व इतर आरोपींविरोधात एक हजार ८९५ पानांचे आरोपपत्र गुन्हे शाखेने शनिवारी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले. वाझे हा खंडणी गोळा करत होता. पण तो एकटा सर्व करत होता, हे विश्वास न बसण्यासारखे आहे. तो हे सर्व परमबीर यांच्यासाठी करत होता. वाझेने ज्यांच्याकडून खंडणी घेतली होती. त्यांच्याकडून या दाव्याची पडताळणी करण्यात आली आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच त्याबाबत पुरावेही मिळाले आहेत. एकूण ६२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातील काही जणांचे जबाब सीआरपीसी १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. परमबीर यांनी दररोज दोन कोटी रुपये वसूली करण्यासाठी सांगितल्याचे वाझेने एका पोलीस अधिकाऱ्याला सांगितले होते. तो याप्रकरणातील प्रमुख साक्षीदार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

 गोरेगावमधील बिमल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाने खंडणीचा आरोप केला होता. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

क्रमांक १.. ’ वसूली प्रकरणात क्रमांक १ हे परमबीर सिंह असल्याचे आपल्याला वाझेने सांगितले होते. तसेच त्याला सिंह यांनी दररोज दोन कोटी रुपयांचे लक्ष्य दिले असल्याचे सांगितल्याचा जबाब एका पोलिसाने दिला आहे. हा जबाब या आरोपपत्राचा भाग आहे. त्याशिवाय इतर साक्षीदारांकडूनही त्याची पडताळणी करण्यात आली आहे. याप्रकरणी सात पोलिसांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  ६९ ध्वनीफितीही याप्रकरणी महत्त्वाचा पुरावा असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime branch first charge sheet filed against param bir singh zws