मुंबई : हॉटेल व्यावसायिकाचे हॉटेल बळकवण्यासाठी धमकावणारा छोटा राजनचा खास हस्तक डी.के. राव याने मध्यस्थी करण्यासाठी इतर आरोपींकडून पैसे घेतल्याचा संशय असून याप्रकरणी गुन्हे शाखा त्याचे आर्थिक व्यवहार तपासणार आहे. त्याशिवाय याप्रकरणी अटक आरोपी अबुबकर सिद्धीकी याच्या मोबाईलमध्ये व्हॉईसनोट्स सापडल्या आहेत. याप्रकरणी डी.के. राव व इतर आरोपींच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.

अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवींद्र मल्लेश बोरा ऊर्फ डी. के. राव (५३) याच्यासह याप्रकरणी अबुबकर अब्दुल्ला सिद्दीकी (३७), इम्रान कलीम शेख (३१), रियाझ कलिम शेख (४०), आसिफ सत्तन खान ऊर्फ साईफ दरबार (३६), जावेद जलालुद्दीन खान (३५) व हानिफ इस्माईन नाईक ऊर्फ अन्नुभाई (५३)  यांना गुन्हे शाखेने २३ जानेवारीला अटक केली होती. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ३०८ (४), ६१ (२) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  छोटा राजनचा खास हस्तक डीके राव याच्याविरोधात यापूर्वी खंडणी, हत्या, अपहरण, दरोडा असे ४२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण प्रकरणात हॉटेल बळकवण्यासाठी आरोपी अबुबकर सिद्दीकी याने डी.के रावची मदत घेतली आहे. त्यामुळे आरोपीकडून डी.के. रावला आर्थिक फायदा देण्यात आल्याचा संशय असून त्याची पडताळणी करण्यासाठी गुन्हे शाखा डी.के. रावच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेणार आहे. याशिवाय अटक आरोपी अबुबकर याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपमध्ये इतर आरोपींच्या व्हॉईस नोट्स सापडल्या आहेत. त्या प्रकरणी तपास करण्यासाठी डी.के. रावसह सर्व आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहे. या व्हॉईस नोट्समधील आवाजाशी त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. ७४ वर्षीय व्यावसायिकाचे हॉटेल बळकावण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला होता.  डी. के. राव याने याप्रकरणात. मध्यस्थी करण्याच्या दृष्टीने तक्रारदाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच अडीच कोटींची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरमी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.