scorecardresearch

“याकूब मेमनला सोडवण्याची मागणी करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार”; अस्लम शेख यांच्यावर भाजपा खासदाराची टीका

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून टीपू सुलतानची वकिली करण्याचे काम सुरु असल्याचे मनोज कोटक म्हणाले

Criticism of BJP MP Manoj Kotak Aslam Sheikh over renaming tipu sultan sports complex

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या याकूब मेमनला सोडवण्याची मागणी करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार अशी टीका भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर केली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून टीपू सुलतानची वकिली करण्याचे काम मंत्री करत आहेत असेही मनोज कोटक यांनी म्हटले आहे. मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद पेटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून सुरु असलेल्या विरोधानंतर बुधवारी संकुलाच्या उद्धाटनाआधी भाजपा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याकडून या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केलं. यानंतर आता भाजपाकडून याला जोरदार विरोध करण्यात येत आहे.

बुधवारी क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. त्यानंतर गोंधळामध्येच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन झाले. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यानंतर आता भाजपा खासदार मनोज कोटक यांनीही महाविकास आघाडी सरकार आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर टीका केली आहे.

“मी धमकी देत नाही पण…”; क्रीडा संकुलाच्या नामांतरणावरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा

“मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या याकूब मेमनला सोडवण्याची मागणी केली त्यांच्याकडून आणखी काही अपेक्षा ठेवता येणार नाही. टीपू सुलतानचे नाव क्रीडा संकुलाला देणे यासारख्या अपेक्षित गोष्टीच ते करत आहेत. पण सरकारला याचा विसर पडला आहे. मुंबईवर हल्ला केलेल्या याकूब मेमनच्या वाचवण्याची मागणी केली त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद आणि मुंबईचे ते पालकमंत्री आहेत. ते टिपू सुलतानचे नाव देणारच. महापौरांच्या तोंडून फक्त वायफळ विरोध केल्याचे आम्ही ऐकले. टिपू सुलतानची वकिली करणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, आजपर्यंत कधी वकिली केली नाहीत आणि महाविकास आघाडी सरकार आल्यापासूनच हे सुरु आहे आणि हे मुंबई शहर बघत आहे,” असे खासदार मनोज कटोक म्हणाले.

टिपूचा राष्ट्रपतींनी केलेला गौरवार्थ उल्लेख भाजपा विसरले का?; नामकरणावरुन सचिन सावंत यांचा सवाल

संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करु – चंद्रकांत पाटील

“ही दडपशाही थांबली नाही तर या आंदोलनाचे लोण महाराष्ट्रभर पसरेल. मी धमकी देत नाही पण वस्तुस्थिती मांडणे हा माझा स्वभाव आहे. देश स्वतंत्र्य झाल्यापासून परकियांच्या एक एक खुणा आपण पुसत आहोत. दुसऱ्या बाजूला टीपू सुलतानचे नाव देण्यासाठी चढाओढ सुरु आहे. हे कोणालाच मान्य नाही आणि त्यासाठी भाजपा आंदोलनाला पाठिंबा देत आहे. ही दंडुकेशाही थांबली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. तिथे नाव आधीपासूनच असेल तर ते काढायलाच पाहिजे,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Criticism of bjp mp manoj kotak aslam sheikh over renaming tipu sultan sports complex abn