शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राज ठाकरेंवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाची आठवण करुन दिली. यावरुन आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“सध्या एकाला बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. ते बाळासाहेबांसारखी शाल घेऊन फिरतात. कधी मराठीच्या नादी लागतात, तर कधी हिंदुत्वाचा नारा देतात. पण लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील मुन्नाभाईच्या डोक्यात जसा केमिकल लोच्या झाला होता तसा यांच्या डोक्यातही झाला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत

“केमिकल लोचा ही मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत भाषा. मांडीला मांडी लावून नवाबभाई चालतात पण मराठीत मुन्नाभाई नाव असले तर चालत नाहीत. नवाबभाई चालतात कारण त्यांचा दाऊदशी संबंध आहे. १९९१ पासून आम्हाला जे संरक्षण आहे ही त्यांची कृपा आहे. दाऊदजा संबंध भाजपासोबत जोडायचा. आमचा काय संबंध दाऊदशी. केंद्र सरकारने सगळ्या कारवाया केल्या आहेत,” असे नारायण राणे म्हणाले.

“काही लोकांना संरक्षण देण्याबद्दल ते बोलले. पण चुकीच्या माणसाला दिले आहे का? १९९१ पासून मला सुरक्षा देण्यात आली आहे. उद्धवजी अजून १० वर्षे जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. चेष्टा, विनोद करणे सोपे आहे. हे शिव्या संपर्क भाषण आहे. सभेमध्ये फेरीवाले आणून बसवले होते. त्यांचा शिवसेनेशी संबध काय,” असा सवाल नारायण राणेंनी केला.

“त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. २५ वर्षे युती करायची आणि नंतर मग मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी करायची. अडीच वर्षे कोणतेही काम झाले नाही. ना मंत्रालय ना कॅबिनेट ना अधिवेशन. असला कसला मुख्यमंत्री असतो. आता काही पुळचट माणसे आहेत त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा आहे. त्यामुळे त्यांनी हे बोलून चांगले विचार द्यावेत,” असेही राणे म्हणाले.