मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांन सीएसएमटी परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला होता. सीएसएमटी रेल्वे स्थानकातही आंदोलकांनी गर्दी केली होती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत होती. मात्र, पोलिसांचे प्रयत्न व्यर्थ ठरत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. आझाद मैदान, सीएसएमटी परिसर तसेच रेल्वे स्थानक आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच रेल्वे स्थानकात आंदोलकांनी नाच गाणी करत धिंगाणा घातल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. फलाटाच्या दुतर्फा आंदोलकांची गर्दी असल्याने चालणेही अवघड झाले आहे. महिलांच्या डब्यात घुसखोरी केलेल्या आंदोलकांनी बाहेर यावे यासाठी पोलीस उद्घोषणा करीत होते.
मुस्लिम मावळ्यांचा आंदोलनात सहभाग
मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून विविध सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाज मुंबईत दाखल झाला आहे. मनोज जारांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मुस्लिम बांधव देखील आंदोलनात सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा सरकारला बुद्धी दे, गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला यश दे’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन मुस्लिम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.